एखादी बाब न्यायप्रविष्ठ असताना त्यावर बाहेर भाष्य करणं चुकीचं आहे. न्यायालयीन प्रक्रियेेवर दबावाचा तो भाग असतो. कधी कधी त्यातून न्यायालयाचा ...
एखादी बाब न्यायप्रविष्ठ असताना त्यावर बाहेर भाष्य करणं चुकीचं आहे. न्यायालयीन प्रक्रियेेवर दबावाचा तो भाग असतो. कधी कधी त्यातून न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता असते. महिलांची इज्जत काचेच्या भांड्यासारखी असते. तिला तडा गेला, की संपलंच. त्यामुळं तिला जपावं लागतं. करुणा आणि रेणू शर्मा या दोन भगिनींनी मुंडे यांच्याबाबतीत जे केलं, त्यामुळं सीतेला नाही, तर रामाला अग्नीपरीक्षा द्यावी लागते आहे.
एखाद्या महिलेचा विनयभंग झाला, किंवा तिच्यावर बलात्कार झाला, तर ती जगजाहीर करीत नसते. कुटुंबातील लोकांना विश्वासात घेऊन पोलिसांत फिर्याद द्यायची, की नाही, ते ठरवित असते. पोलिस आणि काही ठराविक नातेवाइक वगळता तिच्यावर गुजरलेला प्रसंग अन्य कुणाला सांगितला जात नाही. सर्वोच्च न्यायालयानं बलात्कार, विनयंभग झालेल्यांची नावं जाहीर करू नयेत, असा आदेश दिला आहे. कोणतीही महिला बलात्कार झाली, तर आपलं नाव जाहीर करीत नसते. अत्याचारात तिची चूक काहीच नसते; परंतु समाजाचा मात्र तिच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. विनयभंग, बलात्कार करणार्यांची मान शरमेनं खाली जायला हवी; परंतु इथं उलटंच होतं. त्यातही काही महिला आपल्या सौंदर्याचा कसा गैरवारप करतात आणि पुरुषांना, तरुणांना लुटतात, हे अलीकडं अनेक उदाहरणावरून स्पष्ट झालं. डेटिंग अॅपसारख्या अॅपचा दुरुपयोग केला जातो. अब्रूच्या भीतीनं तरुण तक्रारी दाखल करायला पुढं येत नाही. आती सीतेला नाही, तर रामांना अग्नीपरीक्षा देण्याची वेळ येत असते. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांच्याच मेहुणीनं बलात्काराची तक्रार केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दोनच दिवसांपूर्वी पीडितेची ओळख पटेल, असं काहीही करू नका, असा आदेश नगरच्या पोलिस अधिकार्यांना एका प्रकरणात दिला. पीडितेचं नावच नाही, तर तिच्या नातेवाइकांचं नाव, ती शाळा महाविद्यालयात असेल, तर त्यांचं नाव, ती ज्या क्लासमध्ये शिकत असेल, त्याचं नाव, तसंच तिच्या गावाचं नावही जाहीर करण्यास मनाई केली आहे. हा आदेश माध्यमांनाही लागू आहे. त्याचं कारण पीडितेवर अगोदरच आघात झालेला असताना तिची ओळख जाहीर करून तिला समाजात वावरणं अवघड होऊ नये, याची दखल न्यायालयं घेत असतात. बलात्कार पीडित महिला 14 वर्षे गप्प बसू शकत नाही. त्यातही कोणीही कोणत्याही आमिषाला बळी पडून स्वखुशीनं शरीर संबंध ठेवले, तर ती फसवणूक होते, बलात्कार नाही. या पार्श्वभूमीवर आपलं नाव जाहीर करीत, मुंडे यांच्याविरोधात समाज माध्यमातून तक्रार करणार्या रेणू शर्मा हिचा उद्देश सुरुवातीपासून काही वेगळ्याच हेतूनं होता, असा संशय घ्यायला जागा होती. मुंडे यांच्याविरोधातील तक्रारीनंतर भाजपनं त्याचं भांडवल करायचं ठरविलं होतं. तसं आंदोलनही झालं; परंतु भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे, मनसेचे मनीष घरत यांनी रेणूचे प्रताप उघडकीस आणल्यानंतर तिचं खरे स्वरुप पुढं आलं. श्रीमंत, उच्चपदस्थांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून आर्थिक फायदा उपटायचा आणि तो बंद झाला, की मग त्याच्याविरोधात तक्रार करायची, या मानसिकतेची रेणू होती, हे विमान कंपनीतील एका उच्च पदस्थ अधिकार्याच्या तक्रारीवरूनही पुढं आलं होतं. रेणू स्वतःच आरोपीच्या पिंजर्यात उभी राहिल्यानं तिनं तिची तक्रार मागं घेतली. एकीकडं रेणू दररोज मुंडे यांच्याविरोधात आरोप करीत असताना, पोलिस अधिकार्यांच्या भेटी घेत असताना दुसरीकडं तिची बहीण करुणा मात्र शांत होती. हे सर्व महाभारत घडत असताना मुंडे यांनी रेणूची बहीण करुणा हिच्याशी आपण लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याची कबुली दिली होती. तिच्यापासून दोन मुलं असून त्यांना आपलं नाव दिल्याचं म्हटलं. मुलांचा सांभाळ आपण करीत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं. करुणा हिला सदनिका घेऊन देण्यास मदत केली, असं सांगत आपण स्वतःच करुणा आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं म्हटलं होतं. न्यायालयाचं कामकाज कुठल्या टप्प्यावर आहे, याचाही उल्ले्ख त्यांनी केला होता. रेणूच्या वादाच्या काळात करुणा हिनं मौन बाळगलं आणि आता मात्र मुंडे यांच्याविरोधात आरोप केले आहेत. पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळं मुंडे यांच्याविरोधातील अडचणी काही थांबायला तयार नाहीत, हे स्पष्ट झालं. आणखी आठ दिवसांनी याचिकेवरील पुढील कार्यवाही होणार असताना आताच करुणा यांना कंठ का फुटावा, असा प्रश्न उपस्थित होतो. मुंडे म्हणतात, त्याप्रमाणं एखादी बाब न्यायप्रविष्ठ असताना, एकामागून एक तक्रारी टप्प्याटप्प्यानं करायच्या, याचा अर्थ दबाव आणायचा आणि मीडिया ट्रायलद्वारे मुंडे यांची बदनामी करण्याचं षडयंत्र असल्याच्या आरोपात काही तथ्य असावं, अशी शंका घ्यायला वाव आहे. मुंडे यांच्यांशी सहमतीनं संबंधात असलेल्या जोडीदार करुणानं आपल्या तक्रारीत बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जी बाई दोन दशकाहून अधिक काळ लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते. तिला दोन मुलं होतात. स्वखुशीनं शरीर संबंध ठेवते, त्याला आता ती बलात्कार म्हणत असेल, तर दोन्ही बहिणींच्या तक्रारीत साम्य असून त्यांची मानसिकताही सारखीच आहे, असं म्हणायला जागा आहे. करुणा यांची तक्रार गंभीर आहे. करुणा यांनी मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही, तर आपल्या दोन्ही मुलांना मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत तीन महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तीन महिने मुलांना डांबून ठेवलं असेल, तर मागच्या सुनावणीच्या वेळीच न्यायालयाच्या ते का निदर्शनास आणलं नाही किंवा रेणू जेव्हा आरोप करीत होती, तेव्हाच करुणा यांनी तिच्यासोबत येऊन हे सगळं का सांगितलं नाही, हा प्रश्न उरतोच. समाज माध्यमांची दोन्ही बहिणींना फारच आवड दिसते. पोलिस, न्यायालयं अशा यंत्रणा असताना त्या समाज माध्यमांतून न्यायायाची अपेक्षा करीत आहेत. मुंडे यांची बदनामी करीत असताना त्यात आपल्याही अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली जात आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. करुणा यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती; मात्र त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. करुणा धनंजय मुंडे या नावाच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये म्हटलं होतं, की आज माझा वाढदिवस आहे. पतीनं तीन महिन्यांपासून माझ्या मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवलं आहे. त्यांना मला भेटूही देत नाहीत. बोलूही दिलं जात नाही. राजकीय सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. करुणा यांचं हे अकाऊंट खरं आहे, की खोटं हे समजू शकलेलं नाही. गेल्या दोन वर्षांपासून करुणा आणि त्यांची बहीण रेणू यांनी मला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मादेखील सहभागी होता, असा आरोप मुंडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ असताना न्यायालयाबाहेर असे आरोप करणं कितपत संयुक्तिक आहे, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. न्यायालयानं नेमलेल्या समितीची बैठक 13 तारखेला होत असताना त्याच्या दोन आठवडे अगोदर मुंडे यांच्याविरोधात एकामागून एक आरोप करण्याचा हेतू स्वच्छ दिसत नाही. ’सीता हर युग में अग्नि परीक्षा नही देगी,’ असं करुणा म्हणतात. त्या स्वतःला सीता समजतात का? करुणा यांनी केलेल्या आरोपाबाबत मुंडे यांनी दिलेला तपशील जास्त महत्त्वाचा आहे. मुंडे आणि करुणा यांच्यातील विवादावर सहमतीनं तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीनं मध्यस्थ नमेण्याची विनंतीही केली. त्यानंतर न्यायालयानं मध्यस्थाची नियुक्तीदेखील केली आहे. असं असतानाही अशा प्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणं हेतूबद्दल शंका निर्माण करणारं असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. हा आरोप निव्वळ बदमानी करण्याच्या हेतूनं करण्यात येत असून यात काहीच तथ्य नसल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. करुणा शर्मा यांच्या सोबत असलेल्या विवादासंदर्भात मी स्वतः उच्य न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयानं मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती ताहिलरामानी यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. या मेडिएशनच्या आतापर्यंत दोन बैठका झालेल्या असून येत्या 13 फेब्रुवारी रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय येणार आहे, अशी माहिती देतानाच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकार्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणं यामागील हेतूबद्दल शंका निर्माण करणारं आहे, असं जे मुंडे यांनी म्हटलं आहे, ते लक्षात घेतलं, तर जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे ,त्याबद्दल जाहीर मागणी करणं म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नाही, हे स्पष्ट दिसतं. निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणं हाच हेतू यात दिसून येतं, हे मुंडे जे म्हणतात, ते मग खरं वाटू लागतं. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. इतके दिवस थांबणार्या करुणा आठ दिवस का थांबल्या नाहीत, याचं उत्तर मुंडे यांच्या स्पष्टीकरणात आहे.