सोलापूर/प्रतिनिधीः केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर बसलेल्या आंदोलक शेतकर्यांनी प्रजासत्ताकदिनी दिल...
सोलापूर/प्रतिनिधीः केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर बसलेल्या आंदोलक शेतकर्यांनी प्रजासत्ताकदिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. या वेळी रॅलीतील काही उपद्रवी लोकांनी लाल किल्ल्यावर धुडगूस घातला होता. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष र् शरद पवार यांनी मोठा आरोप केला आहे.
प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे शेतकरी नव्हते, तर ते सत्ताधार्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप पवार यांनी केला. सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, की प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला, त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले आहे. दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. मालाला योग्य भाव मिळावा, अशी त्यांची मागणी आहे; मात्र केंद्र सरकार केवळ आश्वासनेच देत आहे. प्रत्यक्षात काहीही करत नाही, असेही पवार म्हणाले. तत्पूर्वी लोकसभेत बोलताना, शरद पवार यांनीच केंद्रीय कृषिमंत्री असताना कृषी कायदे लागू करण्यासाठीचे वक्तव्य केले होते. मग आता विरोध का, असा सवाल करत, त्यांनी कृषी कायद्यांसंदर्भात अचानक यू-टर्न कसा घेतला याचे आश्चर्य वाटते, असे मोदी म्हणाले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना पवार यांनी राज्यांना पाठविलेले पत्र वाचून दाखवित मोदी यांच्या यू टर्नची अनेक उदाहरणे लोकसभेत दिली होती. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांनी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला नंतर हिंसक वळण मिळाले होते. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स पाडून आंदोलक शेतकर्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्यावर कब्जा केल्यानंतर आंदोलकांनी येथे आपला झेंडा फडकवला होता.