बिकानेर : काश्मीर खोर्यात पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरू असतात; परंतु आता पाकिस्तानने राजस्थान सीमेवर कुरघोड्या वाढविल्या आहेत. काश्मीरमध्ये ...
बिकानेर : काश्मीर खोर्यात पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरू असतात; परंतु आता पाकिस्तानने राजस्थान सीमेवर कुरघोड्या वाढविल्या आहेत. काश्मीरमध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाने भुयारी बोगद्यांचा शोध लावला, तसाच शोध आता राजस्थानच्या सीमांवर लागला आहे. भारतीय सीमा सुरक्षा दल त्यामुळे सावध झाले आहे.
भारतीय सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना म्हणाले, की सीमावर्ती भागातील लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना येऊ नये, यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या स्तरावरही अनेक उपक्रम राबविले जातात. जम्मू-काश्मीर सीमेवर सीमा सुरक्षा दलाने पूर्वी सुरुवातीला अँटी-टनेलिंग ऑपरेशन केले आणि दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्यासाठी तयार केलेल्या अशा अनेक बोगद्यांचा शोध लागला. या मोहिमेत अनेक दहशतवादीही ठार झाले. त्याचप्रमाणे पश्चिम राजस्थानातील बिकानेर, श्रीगंगानगर आणि बाडमेरच्या सीमेवर सीमा सुरक्षा दल हाय अलर्ट मोडवर आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतात अंमली पदार्थांची तस्करी करीत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अधिक दक्षता असल्याने राजस्थानच्या पश्चिम सीमेवर दहशतवादी कारवाया वाढण्याची चिन्हे आहेत. अस्थाना म्हणाले, की समाज माध्यमांचा उपयोग करून भारतीय तरूणांना बहकण्याचे काम पाकिस्तान करीत आहे, याची जाणीव भारतीय सीमा सुरक्षा दलाला आहे. सीमा सुरक्षा दल केवळ सुरक्षेचेच काम करीत नाही, तर भारतीय तरुणांना या भागात पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून देत आहे. बिकानेरमधील आणि जैसलमेर येथे काही स्तूप विकसित केले जात आहे. या दोन्ही ठिकाणी संग्रहालय आणि विव्हर गॅलरी तयार केली जाईल. भारतीय सीमा सुरक्षा दलांत महिला अतिशय चांगले काम करीत आहे. त्या गस्त घालतात. शस्त्रेही चालवतात. त्यामुळे आता महिलांना सामावून घेण्यावर भर दिला जात आहे.