अहमदनगर/प्रतिनिधीः महसूल, जिल्हा परिषद, बांधकाम व शिक्षण विभागातील कर्मचार्यांकडून किरकोळ चुका झाल्यानंतर सहसा त्यांना कोणी शिक्षा करीत न...
अहमदनगर/प्रतिनिधीः महसूल, जिल्हा परिषद, बांधकाम व शिक्षण विभागातील कर्मचार्यांकडून किरकोळ चुका झाल्यानंतर सहसा त्यांना कोणी शिक्षा करीत नाही वा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. गंभीर चूक झाल्यास चौकशीला सामोरे जावे लागते. त्यातून कारवाईही होते; मात्र किरकोळ चुकीसाठी सहसा कारवाई केली जात नाही. पोलिस दलातही किरकोळ चुकीकडे कोणी लक्ष देत नाही; मात्र शुद्धलेखनातील चुकीसाठी पन्नास उठबशा काढाव्या लागतात. दैनंदिन कामातील किरकोळ चुका टाळण्यासाठी पोलिस दलाच्या जिल्हा विशेष शाखेच्या अधिकार्यांनी कर्मचार्यांच्या चुकींवर पांघरून न घालता वेगळाच फंडा वापरला आहे.
जिल्हा विशेष शाखेतून जिल्ह्यातील पोलिस दलाचे नियोजन केले जाते. सर्व पोलिस ठाण्यांशी पत्रव्यवहार केला जातो. बंदोबस्ताचे नियोजन होते. पोलिस दलात जिल्हा विशेष शाखेची भूमिका महत्त्वाची असते. तेथे दैनंदिन काम करताना, कर्मचार्यांकडून संगणकावर कॉपी पेस्ट, पत्रव्यवहारातील शुद्धलेखनाच्या चुका होतात. अशा चुका टाळण्यासाठी प्रशासनाने शिक्षेचा नवा फंडा शोधला आहे. दैनंदिन कामात किरकोळ चुका झाल्यास, कर्मचार्यास 50 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जाते. त्याचा फोटो काढून वरिष्ठांपर्यंत जातो. आतापर्यंत जिल्हा विशेष शाखेतील अनेक कर्मचार्यांना ही शिक्षा दिली गेली आहे.