विज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीसाठी भारतीय जनता पार्टीचे आवाहन कोपरगाव शहर प्रतिनिधी - राज्यातील लाखो वीज ग्राहकांच...
विज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीसाठी भारतीय जनता पार्टीचे आवाहन
कोपरगाव शहर प्रतिनिधी - राज्यातील लाखो वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याच्या राज्य सरकारच्या या जुलमी निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्य सरकारने थकीत ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने वीज कंपनीच्या विरोधात ०५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वा. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव मध्ये ‘टाळे ठोको’ आंदोलन आयोजित केले असुन अंदोलनास सर्व वीज ग्राहक आणि शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम , शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केले आहेत.
कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिलांची वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी देणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करु देणार नाही.
भारतीय जनता पक्षाचे राज्यात सरकार असताना शेतकर्यांना कधीही वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही व वीज ग्राहकांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागला नाही. उलट वीज ग्राहकांना दिलासा देण्याची भूमिकाच भाजपा सरकारने घेतली होती. थकबाकी वाढली तरी तो अर्थिक भार राज्य सरकारने स्वतावर घेतला.
कोरोना काळात अवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या मानसिकतेत नाही. या कंपनीला तसेच शासनाला जाग आणण्यासाठी ग्राहकांना आलेल्या जादा रकमेच्या बिलांची होळी करुन आम्ही सरकारला इशारा दिला होता. याची आठवण करुन देतांना, कोरोना प्रसारापूर्वी राज्य सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनी राज्यातील जनतेला शंभर यूनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजवर ते पाळले गेले नसल्याने ती घोषणा फसवी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ग्राहकांना न्याय देण्यासाठी पुकारलेल्या अंदोलनास विज ग्राहकांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम व शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केले आहे.