मेढा / प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील श्रीक्षेत्र कुसूंबीची ग्रामदेवता काळेश्वरीची ...
मेढा / प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील श्रीक्षेत्र कुसूंबीची ग्रामदेवता काळेश्वरीची यात्रा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रद्द करण्यात आली आहे.
26 फेब्रुवारी रोजी ध्वज काठी उभारून यात्रेला प्रारंभ होणार आहे. रविवार, दि 28 रोजी सकाळी 7 वाजता रुद्राभिषेक होणार असून 1 व 2 मार्च रोजी देवीची मुख्य यात्रा होणार आहे. दरम्यान, यात्रा काळात भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे. मात्र, जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार यात्रेतील धार्मिक विधी पुजाअर्चा, रुढी, पंरपरेनुसार देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी, ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांनी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सोपान टोणपे यांनी दिल्या आहेत.
यात्रा काळात कलम 144 लागू करण्यात येणार असून गावाच्या सर्व सिमा बंद केल्या जाणार आहेत. यात्रा काळात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे.
कुसूंबीची काळूबाईच्या यात्रेच्या नियोजनाकरीता तहसीलदार कार्यालय जावली (मेढा) या ठिकाणी बुधवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी प्रांताधिकारी सोपान टोणपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीसाठी तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतिशजी बुध्दे, मेढ्याचे सपोनिअमोल माने, कुसूंबीच्या सरपंच पुष्पा चिकणे, श्री काळेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष रामदास वेंदे, ट्रस्टचे पदाधिकारी विजय वेंदे, बाजीराव चिकणे, जगन्नाथ चिकणे, तुकाराम चिकणे, ज्ञानेश्वर चिकणे, पोलीस पाटील, तलाठी, आरोग्य अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.