नवी दिल्ली : राज्यसभेत आज चार खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे रुप पहायला मिळाले, ते ऐतिहासिक आहे. बर्याच काळापर्यं...
नवी दिल्ली : राज्यसभेत आज चार खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे रुप पहायला मिळाले, ते ऐतिहासिक आहे. बर्याच काळापर्यंत ते लक्षात राहील असे आहे. एवढेच नाही, तर मोदी यांचे संपूर्ण भाषण आपली राजकीय समज बदलणारे आहे. समृद्ध करणारे आहे. राज्यसभेत आज जम्मू-काश्मीरच्या चार खासदारांना निरोप देण्यात आला. यात काँग्रेसचे राज्यसभेतले नेते गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे.
मोदी यांनी चारही खासदारांबद्दल गौरवोदगार काढले; पण गुलाम नबी आझाद यांंचा गौरव करताना मात्र मोदी एवढे भावनावश झाले, की एकदा त्यांचा आवाज येणे बंद झाले. त्यांचा कंठ दाटून आला. सभागृहात त्या वेळी प्रचंड शांतता पसरली. मोदींची अशी अवस्था एक दोन मिनिटे नाही तर जवळपास पाच मिनिटे होती. मोदी आझादांबद्दल बोलत होते आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. जवळपास तीन वेळा मोदी यांनी अश्रू पुसले. दोन वेळा पाणी घेत स्वत:ला सावरण्याचाही मोदी यांनी प्रयत्न केला; पण काँग्रेस नेत्याबद्दल बोलताना मोदी यांचे अश्रू थांबले नाहीत. आझाद यांचे काम कसे आहे याचे उदाहरण मोदी यांनी दिले. ते म्हणाले, की मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि आझाद हे जम्मू आणि काश्मीरचे. त्या वेळी काश्मीरमध्ये गुजराती पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्या घटनेनंतर आझाद यांनी मला फोन केला, त्या वेळी आझाद फोनवरच रडत होते. स्वत:च्या घरातला माणूस गेल्यासारखे त्यांची अवस्था होती. ते मृतदेह आणि नातेवाइकांना परत गुजरातला आणण्यासाठी रात्री विमानतळावर राहिले. सकाळीही त्यांनी मला फोन केला. सगळे व्यवस्थित पोहोचले का, म्हणून विचारले. या सगळ्या प्रसंगात आझाद एखाद्या कुटुंबातल्या सदस्यासारखे वागल्याचे मोदी म्हणाले. हा पूर्ण प्रसंग सांगतानाच मोदी भावनावश झाले.