मुंबई/प्रतिनिधी : ‘हिंदू समाज पूर्णत: सडका बनलाय’, असे वक्तव्य करणार्या शरजील उस्मानीविरोधात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवी...
मुंबई/प्रतिनिधी : ‘हिंदू समाज पूर्णत: सडका बनलाय’, असे वक्तव्य करणार्या शरजील उस्मानीविरोधात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात काय मोगलाई आहे का, असे सवाल करीत सरकारला लाज वाटायला हवी, अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरले. गृहमंत्री म्हणतात, आम्ही चौकशी करू. सगळे समोर असताना, व्हिडीओ व्हायरल होत असताना कसली चौकशी करता? तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करा, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.
शारजीलासारखा कुठला सडक्या डोक्याचा माणूस महाराष्ट्रात येऊन हिंदूंना सडका म्हणत असेल आणि सरकार त्याच्यावर कारवाई करत नसेल, तर भाजप स्वस्थ बसणार नाही. तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक केली नाही, तर त्याविरोधात आम्ही आंदोलन करू, असा असा निर्वाणीचा इशारा फडणवीस यांनी दिला. एल्गार परिषद ही फक्त आग ओकण्याकरता, समजात तेढ निर्माण करण्यासाठी होते, हे माहिती असूनही परवानगी कशी मिळते. या परिषदेत हिंदूंच्या विरोधात बोलले जात आहे ते सरकारच्या मर्जीने बोलले जात आहे का, असा सवाल फडणवीस यांनी केला. शरजीलच्या वक्तव्याला 48 तास उलटून गेले, तरी शिवसेनेचा एकही नेता त्याबाबत बोलला नाही. त्याबाबत बोलताना शिवसेना सत्तेला मिंधी झाली आहे. शिवसेना सत्तेला नतमस्तक झाली, म्हणून ते यावर बोलूच शकत नाहीत, असा घणाघातही त्यांनी केला. एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवतो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे, की हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करुन, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.