नवीदिल्ली : विश्वासघातकी चीनने शुक्रवारी रात्री गलवान घाटीतील हिंसाचाराचा व्हिडीओ जारी करून भारतीय सैन्यानेच हल्ला केल्याचा दावा केला होता...
नवीदिल्ली : विश्वासघातकी चीनने शुक्रवारी रात्री गलवान घाटीतील हिंसाचाराचा व्हिडीओ जारी करून भारतीय सैन्यानेच हल्ला केल्याचा दावा केला होता. तसेच पीपल्स लिबरेशन आर्मीच्या चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले होते. भारतीय जवानांवर आरोप करणाऱा चीन आता त्यानेच प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये तोंडघशी पडला आहे.
सॅटेलाईट इमेजरी आणि गुगल अर्थवर या व्हिडीओचे विश्लेषन केल्यावर चीनवर नजर ठेवणार्या एका तज्ज्ञाने भारत-चीनमध्ये जी झटापट झाली, ती जागा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 50 मीटर आतमध्ये भारताच्या बाजूला आहे. यामुळे हा हल्ला भारतीय जवानांनी नाही, तर चीनच्या सैन्याने केल्याचे उघड झाले आहे. चीनवर नजर ठेवणारे आणि ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ नाथन रुसर यांनी सॅटेलाईट फोटोद्वारे चीनचा दावा सपशेल खोटा असल्याचे सांगितले आहे. जियोलोकेटरच्या मदतीने ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य भिडले, ती जागा भारतीय हद्दीत 50 मीटर आतमध्ये आहे. भारतीय सैन्याच्या फुटेजमध्ये गलवान खोर्याच्या दक्षिणेकडे भारतीय जवान चालताना दिसतात. तो दगड भारतीय सीमेमध्ये हिरव्या रंगाने दाखविलेल्या स्थानावर असणार, याची मला खात्री आहे. यामुळे चीनचेच सैन्य भारतीय हद्दीत घुसले होते आणि हल्ला केला होता, हे स्पष्ट होते, असे नाथन यांनी सांगितले. लडाखमध्ये गेल्या वर्षी भारतीय जवानांवर चिनी सैनिकांनी केलेल्या जिवघेण्या हल्ल्याचा व्हिडीओ चीनने जारी केला आहे. यामध्ये चीनने नाही, तर भारतानेच हल्ला केल्याचे दाखविण्यात आले आहे. चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईंम्सने हा व्हिडीओ जारी करत भारतानेच हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या व्हिडीओमध्ये नदीच्या किनार्यावर चिनी पोस्ट दिसत आहे, तर चीनच्या एका अधिकार्यासमोर भारतीय जवान आक्रमक झाल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर भारतीय जवानांना चीनच्या सैनिकांनी मोठ्या संख्येने घेरल्याचेही दाखविण्यात आले आहे. या वेळी चिनी सैनिकांच्या हातात लाठ्याकाठ्या आहेत. संपादित केलेल्या या व्हिडीओत काही वेळाने एका चिनी सैनिकाचे फुटलेले डोके दाखविण्यात आले आहे. यानंतर गलवान खोर्यात मारल्या गेलेल्या चिनी सैनिकांचे फोटो दाखविण्यात आले आहेत. हा व्हिडीओ जुना असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनने की फाबाओ यांना ’हीरो’ चा सन्मान दिला आहे. भारतीय सैन्याने अनधिकृतपणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार केली होती. भारतीय जवानांच्या हाती स्टीलच्या लाठ्या, ट्यूब आणि दगड होते. त्यांनी याद्वारे आमच्या सैनिकांवर हल्ला केला. एप्रिल 2020 मध्ये भारताने पहिल्यांदा समझोत्याचे उल्लंघन केले. रस्ते आणि पूल बनविण्यासाठी ते आमच्या सीमेत घुसले, असा आरोप चीनने केला आहे.