मुंबई/प्रतिनिधी : राज्यात तीन राजकीय पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या राजकीय पक्षांनी समान कार्यक्रम...
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात तीन राजकीय पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या राजकीय पक्षांनी समान कार्यक्रम आखत सरकार स्थापन केले. या सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे दिली आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप या नावांना मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे आघाडी सरकारकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुण्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना इशारा दिला होता. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही इशारा दिला आहे. त्यामुळे आता राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला उशीर होत आहे. राज्यपालांकडे दोनवेळा प्रस्ताव पाठविण्यात आला. पहिल्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगण्यात आल्यानंतर आघाडी सरकारकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनुसार दुसरा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यात 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे आहेत; मात्र आमदार नियुक्तीबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यपाल उशीर करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. राज्यपाल स्वतःला घटनाप्रमुख समजत असतील, तर त्यांनी न्यायालयात जायला लावू नये. राज्यपाल एका पक्षाचे प्रतिनधित्व करत आहेत. घटनेची बूज राखायची असेल तर राज्यपालांना परत बोलवावे, असे खा. राऊत म्हणाले. दरम्यान, दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन राऊत यांनी केंद्राला खडेबोल सुनावले आहेत. केंद्र सरकारने बहुमताच्या अहंकारात राहू नये, मोदी दोन पावले मागे आले, तर उंची कमी होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राज्यपालांना इशारा दिला आहे. राज्यपाल यांनी आपला अंत पाहू नये, अशा शब्दांत अजितदादांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनिशी प्रस्ताव दिला आहे. तसेच 171 आमदारांचे बहुमत सिद्ध झालेले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आपण याबाबत राज्यपालांशी चर्चा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. असे असताना राऊत यांनीही टोला लगावल्याने राज्यपाल काय निर्णय घेणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.