औरंगाबाद/प्रतिनिधी: एकेकाळी मंत्र्यांच्या गाड्या अडवणार्या शिवसेनेच्याच मंत्र्यांच्या गाड्या आता मनसेने अडवायला सुरुवात केली आहे. औरंगाबादच...
औरंगाबाद/प्रतिनिधी: एकेकाळी मंत्र्यांच्या गाड्या अडवणार्या शिवसेनेच्याच मंत्र्यांच्या गाड्या आता मनसेने अडवायला सुरुवात केली आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून आज मनसेने शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. त्यांना जाब विचारला आणि त्यांच्या अंगावर पत्रके फेकून जोरदार घोषणाबाजीही केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौर्यापूर्वीच मनसेने राडा केला आहे.
औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करण्याचा अल्टिमेटम मनसेने शिवसेनेला दिला होता. हा अल्टिमेटम संपला, तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. खैरे यांची गाडी क्रांती चौकातून जाणार असल्याचे कळल्यानंतर शेकडो मनसेसैनिक हातात झेंडे घेऊन क्रांती चौकात दाखल झाले. मनसे सैनिकांनी खैरे यांची गाडी येताच त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे खैरे यांना गाडीच्या बाहेर यावे लागल. या वेळी खैरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण आक्रमक कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी करत औरंगाबादचे नामांतर का होत नाही? असा जाब खैरे यांना विचारला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या निषेधाची पत्रके खैरे यांच्या अंगावर फेकून दिली. या वेळी मनसे सैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी,’ आणि ‘धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे नेहमी आक्रमक भूमिका घेणार्या खैरे यांना गप्प उभे राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या वेळी खैरे यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे आश्वासन दिले.