कवठेमहांकाळ / प्रतिनिधी : खोटी माहिती देऊन लोकांची फसवणूक करून अवैधरित्या दुर्मिळ मांडूळ जातीचे साप विकरणारी टोळी पोलिसांनी पकडली. सापाची वि...
कवठेमहांकाळ / प्रतिनिधी : खोटी माहिती देऊन लोकांची फसवणूक करून अवैधरित्या दुर्मिळ मांडूळ जातीचे साप विकरणारी टोळी पोलिसांनी पकडली. सापाची विनापरवाना विक्री केल्याबद्दल पोलिसांनी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. शहरापासून जवळच मेघराज मंदिराजवळ रविवारी रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. टोळीकडून तीन मांडूळ जप्त करण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंदाजे किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. मांडूळ विक्री करणारी टोळी मेघराज मंदिराजवळ येणार असल्याची माहिती पोलीस नाईक आमीरशा फकीर यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल कोलंबीकर, शिवाजी करे, पोलीस हवालदार दीपक गायकवाड, संजय चव्हाण, आण्णासो भोसले, चंद्रसिंग साबळे, प्रशांत मोहिते, वनपाल अधिकारी आर. आर. चौगुले, वनरक्षक अधिकारी डी. एस. बजबळकर यांनी सापळा रचून सहाजणांना ताब्यात घेतले.
त्यातील तिघे सोलापूर, दोघे कोल्हापूर व एक बेळगावचा आहे. गजानन वसंत सरगर, संजय अशोक ओलेकर, तीप्पाण्णा म्हाळाप्पा तडवळे (सर्व सलगरे खुर्द, जि. सोलापूर), महादेव मनोहर बेनाडे, युवराज दत्तात्रय मगदूम (इचलकरंजी, जि. कोल्हापूर) तर वाहन चालक विवेक राजेंद्र बेनाडे (डोणेवाडी, जि. बेळगाव) यांच्या ताब्यातील वायरच्या पिशवीतून तीन दुर्मिळ साप (मांडूळ) विनापरवाना बाळगल्याने ताब्यात घेतले. या सहा जणांविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि शिवाजी करे तपास करत आहेत.