कल्याण/प्रतिनिधी : मोबाईल स्नॅचिंग प्रकरणातील आरोपीला घेऊन जाणार्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांवर कल्याण पश्चिमेकडील इराणी वस्तीमधील लोकांनी ...
कल्याण/प्रतिनिधी : मोबाईल स्नॅचिंग प्रकरणातील आरोपीला घेऊन जाणार्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांवर कल्याण पश्चिमेकडील इराणी वस्तीमधील लोकांनी दगडफेक केली. आरोपीच्या साथीदारांनी आणि त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला करून, आरोपीला पोलिसांच्या गाडीतून बाहेर काढून हल्लेखोर पसार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मोबाईल स्नॅचिंग करणार्या आरोपीला वसई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी इराणी वस्तीजवळ ताब्यात घेतले होते. रेल्वे फाटक बंद असल्याने पोलिसांची कार फाटकाजवळ थांबली होती. आरोपीच्या साथीदारांनी आणि इराणी नातेवाइकांनी पोलिस पथकावर दगडफेक सुरू केली. त्यात दोन पोलिस जखमी झाले आहेत. पोलिस कारमध्ये बसलेल्या आरोपीला घेऊन इराणी हल्लेखोर पसार झाले आहेत. ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 2008 पासून इराणी वस्तीत गेलेल्या पोलिसांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत. कल्याण पश्चिमेकडील आंबिवली परिसरात असलेली इराणी वस्ती ही चोरांची वस्ती म्हणून ओळखली जाते. राज्यासह देशभरातील अनेक गुन्ह्यांच्या घटनांमधील आरोपी या वस्तीत राहतात. पोलिस जेव्हा या वस्तीत कारवाईसाठी जातात, तेव्हा पोलिसांवर अशाच प्रकारचा हल्ला केला जातो आणि आरोपींना पळवून नेले जाते अथवा तसा प्रयत्न केला जातो. यात अनेकदा पोलिस जखमी झाले आहेत.