पुणे/प्रतिनिधीः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवजयंतीनिमित्त केलेल्या भाषणातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला...
पुणे/प्रतिनिधीः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवजयंतीनिमित्त केलेल्या भाषणातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला. अजित पवारांच्या मनात नेमके काय चालू आहे, हे जाणून घेण्यासाठी एका खास भाषेची गरज आहे आणि ती भाषा मला शिकायची आहे, अशी इच्छा ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे.
शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवनेरी किल्यावर भाषण करताना ठाकरे यांनी हे विधान केले. त्यानंतर व्यासपीठावर एकच हशा पिकला होता. ठाकरे म्हणाले, की शिवाजी महाराजांना अनेक भाषा येत होत्या. त्यातली एक भाषा अजितदादांनाही येते. त्यामुळे ती भाषा मला आता शिकायची आहे. कारण दादांच्या मनात नेमकेकाय सुरू आहे, हे कळाले पाहिजे. किमान त्यासाठी तरी मला ती भाषा शिकायची आहे. महाराजांपुढे नतमस्तक होण्यासाठी शिवजंयतीच असायला पाहिजे असे काही नाही. कोणतेही पवित्र काम करताना आपल्याला छत्रपतीच आठवतात. कारण शिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे. शिवरायांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या प्रेमामुळे हा हा बहुमान मला लाभला आहे, असे ते म्हणाले ठाकरे यांनी यावेळी किल्ले शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करत त्यांना अभिवादन केले. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर शिवनेरीवर सभा झाली.