राष्ट्रीय महिला आयोगानं टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत; मात्र त्याअगोदरच पोलिसांनी चौक...
राष्ट्रीय महिला आयोगानं टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत; मात्र त्याअगोदरच पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी इतक्यात मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरण्यास नकार दिला असताना पूजाच्या मेहुण्यानं मंत्र्यांना क्लिन चीट दिली आहे. दुसरीकडं पूजाचं कुटुंब आत्महत्येच्या चौकशीची मागणी करीत असल्यानं पूजा राहत असलेल्या घरात मद्याच्या बाटल्या सापडल्यानं तिचा खून, की आत्महत्या असा नवा ट्विस्ट या प्रकरणाला आला आहे.
टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणाला आता आठवडा झाला असला, तरी त्यातील गुंता अजून सुटलेला नाही, उलट वाढत चालला आहे. पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. या प्रकरणाला आता आणखी वेगवेगळी वळणं लागत आहेत. या प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे. या प्रकरणाबाबत ज्यांच्यावर संशय घेतला जातो, त्या वनमंत्री संजय राठोड यांच्याशी आणि पूजाशी ज्याच्यामार्फत संपर्क होता, तो अरुण राठोड गायब झाला आहे. तो बीड जिल्ह्यात लपला असल्याचा संशय आहे. पूजाच्या आत्महत्येशी मंत्र्यांशी संबंध नसल्याचा दावा पूजाच्या मेहुण्यानंच केला आहे. गणेश राठोड असं त्यांचं नाव. पूजाच्या स्वभावाची चांगलीच माहिती असून यापूर्वी तिनं प्रत्येक बाब शेअर केल्याची माहिती देऊन, तिच्यावर दोन वर्षे नैराश्याचे उपचार सुरू होते, अशी माहिती गणेश राठोड यांनी दिली आहे. पूजाची बहीण, आईवडील आदी पूजाच्या आत्महत्येशी मंत्र्यांचा संबंध जोडत नसताना केवळ ऑडिओ क्लिपच्या आधारे मंत्र्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं जात आहे. त्यात अपेक्षेप्रमाणं भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. त्यातही चित्रा वाघ यांनी थेट मंत्र्यांचं नाव घेतलं असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मात्र त्यांचं नाव घ्यायला तयार नाही. त्यामुळं भाजपतच विसंवाद असल्याचं चित्र पुढं आलं. भारतीय जनता पक्षानं या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला. शिवसेनेचा मंत्री असल्यानं शिवसेनेनं या प्रकरणी सबुरीची भूमिका घेतली असताना अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी होत असून, चौकशीअगोदरच कुणाला आरोपी ठरविण्याची घाई करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असले, तरी पोलिसांनी या प्रकरणाची अगोदरच चौकशी सुरू केली आहे. या तपासात अनेक नवनवीन गोष्टी पुढे येत असल्यानं या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढला आहे. पूजा राहत होती, त्या घरात मद्याच्या बाटल्या सापडल्यानं पूजा नशेत होती का? नशेतच ती गॅलरीतून पडली, की तिला कुणी ढकललं? असे प्रश्न निर्माण झाले असून त्या दिशेनंही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत होता. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी पूजाच्या घराची तपासणी केली असता तिच्या घरात मद्याच्या चार बाटल्या सापडल्या. त्यातील अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. त्यावरून घरातील व्यक्तींनी मद्य प्राशन केल्याचा पोलिसांना संशय आहे; मात्र पूजानं मद्य प्राशन केलं होतं की नाही, या बाबतचा उलगडा अद्याप झालेला नाही; परंतु मद्याच्या बाटल्या सापडल्यानं पूजाचा मद्याच्या नशेत गॅलरीतून तोल तर गेला नाही ना? किंवा तिला नशेत कुणी ढकलून तर दिलं नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाशी संबंधित कथित 11 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यात मद्य प्राशनाचा कुठंही उल्लेख नाही. शिवाय अरुण राठोड हा कथित मंत्र्याला पूजाचा पडून मृत्यू झाल्याचं सांगतो. इमारतीच्या खाली सिमेंटचा रस्ता आहे. पडल्यामुळं रस्त्यावर डोकं आदळल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं तो कथित मंत्र्याला सांगतो. पोलिसांनीही या अरुण नावाच्या व्यक्तीची रुग्णालयात जबानी घेतली असता त्यातही तो तेच सांगतो. शिवाय ती पडल्यानंतर आम्हाला कळल्याचंही तो सांगतो. यावरून पूजानं गॅलरीतून उडी घेतली, तेव्हा गॅलरीत ती एकटीच होती, असा अंदाज आहे. या क्लिपमध्ये कथित मंत्री आणि विलास (पूजाचा कथित भाऊ) यांचं संभाषण आहे. पूजाच्या मृत्यूनंतरच्या संभाषणात काय स्टेटमेंट द्यायचं, हे मंत्री विलासला सांगताना दिसतात. कुणी विचारलं, तर आम्ही झोपलो होतो. ती चक्कर येऊन पडली, असं सांग असे मंत्री विलासला सांगतात. त्यावर माझी सांगायची हिंमत होत नसल्याचं विलास म्हणतो; पण तरीही मंत्री त्याला चक्कर येऊन पडल्याचं सांग म्हणून सांगतात. गॅलरीतून बॅलन्स गेला, चक्कर आली, असंही सांगतात. मंत्र्यांना त्यातून काय लपवायचे होतं आणि पूजाचे मेहुणेच मंत्र्यांना क्लिन चीट का देतात, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. शेवटच्या क्लिपमध्येही मंत्री अरुणला मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. क्लिपमधील या संभाषणातून पूजाच्याबाबतीत नेमकं काय झालं? नेमकं काय लपवलं जात आहे, असे प्रश्न उपस्थित होतात. पूजानं आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजानं नैराश्यातून आत्महत्या केली आहे, तर पूजाच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्यानं तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी शवविच्छेदन अहवालातील मोजकीच माहिती का दिली, यावरून शंका घ्यायला जागा उरते. पूजानं आत्महत्या केल्याच्या घटनेला आठवडा झाला असला, तरी अद्यापही कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसंच कुणावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांनी तिच्यासोबत राहणार्या दोन्ही तरुणांचे जबाब नोंदवले आहेत; मात्र तांत्रिक अडचणीमुळे गुन्हा नोंदवता येत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. ही तांत्रिक अडचण काय आहे हे मात्र पोलिस सांगत नाहीत. त्यामुळं गुंता वाढत चालला आहे. पूजाच्या कुटुंबीयांनी पूजाच्या आत्महत्येला जबाबदार असणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे; मात्र तिच्या कुटुंबीयांनी कुणावरही संशय व्यक्त केला नसून कुणाच्याही विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अरुण राठोड या तरुणाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. पूजा आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यात वन मंत्री संजय राठोड आणि अरुण राठोड यांचं संभाषण होतं. त्यावरून या दोघांनाही पूजा आत्महत्या करणार असल्याचं माहीत असल्याचं दिसून येतं. अरुण हा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा चेहरा असल्याचं मानलं जातं. अरुण राठोड हा वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता आहे. तो संजय राठोड यांच्या अत्यंत जवळचा असून राठोड यांच्या सर्व खासगी गोष्टी अरुणला माहीत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. संजय राठोड यांच्या घरी, कार्यालयात आणि मंत्रालयातही अरुणचा मुक्त संचार असल्यानं तो मंत्र्याच्या किती जवळचा आहे, हे लक्षात येतं. तसंच पूजाचं शवविच्छेदन झाल्यानंतर तो गायब का झाला, असा प्रश्न उपस्थित होतो. अरुण हा बीड जिल्ह्यातील परळीच्या दारावती तांडा येथील रहिवासी आहे. तो पुण्यात पूजा सोबत राहत होता. पूजाला काय हवं नको ते देण्याचं काम त्याच्याकडं होतं, असं सूत्रांनी सांगितलं. पूजाच्या राहण्याची व्यवस्था मंत्र्यांनी अरुणकडं सोपवली होती. अरुण आणि पूजा चव्हाणचं कोणतंही रिलेशन नाही. ते नातेवाइक नाहीत. मंत्री राठोड यांनी पूजाची सर्व जबाबदारी अरुणकडं सोपवली होती. मंत्र्यांच्या संपर्कात आल्यानंतरच पूजाची प्रगती झाली. पूजाला मॉडेलिंग करायचं होतं. त्यात अरुण तिला मदत करत होता. त्यामुळं हे दोघंही पुण्यात एकत्र राहू लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.अरुण आणि मंत्र्याच्या संभाषणातून अरुणला पूजाच्या स्वभावाची खडा न् खडा माहिती असल्याचं दिसून येतं. पूजा थोडी सर्किट आहे म्हणजे हट्टी आहे. ती ऐकणार नाही, असं अरुण मंत्र्याला सांगतो. यावरून पूजानं एकदा निर्णय घेतला, तर ती मागं हटत नाही, हे त्याला माहीत असल्याचं स्पष्ट होतं. तसंच पूजासोबत त्याची पूर्वीपासूनच ओळख असावी असाही अंदाज या क्लिपमधील संभाषण ऐकल्यावर येतो.
अरुण याचा पूजाशी काहीही संबंध नव्हता. तो पूजाचा नातेवाइक नव्हता; पण बाहेर वावरताना पूजाचा चुलत भाऊ असल्याचं तो सांगायचा. पूजाला एकूण सहा बहिणी आहेत. पूजा ही पाचवी आहे. तिच्या चारही बहिणींचं लग्न झालेलं आहे. तिला भाऊ नाही; मात्र व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये अरुण हा पोलिसांना तो पूजाचा चुलत भाऊ असल्याचं सांगत असल्याचं ऐकायला मिळतं. पूजानंआत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्यानं तो घाबरला होता होता. त्यामुळंच तो आत्महत्या काही पर्याय नाही, तुम्ही तिला समजवा. तिला वाचवा. तिला कन्व्हिन्स करा, असं वारंवार मंत्र्यांना सांगत असल्याचं या क्लिपमधून जाणवतं.
या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा म्हणजे पूजाचा मोबाईल आहे. हा मोबाईल लंपास करण्यासाठी मंत्र्यांनी अरुणवर वारंवार दबाव आणल्याचं क्लिपमधून स्पष्ट होतं. त्यामुळं अरुणनं पूजाचा मोबाईल लंपास केल्याचंही कळतं. या मोबाईलमध्ये असंख्य पुरावे असावेत म्हणूनच हा मोबाईल लंपास केला असावा. हा मोबाईल सापडल्यास अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येतील. त्यामुळंपोलिसांनी हा मोबाईल हस्तगत करण्याची आणि अरुणला अटक करण्याची आवश्यकता आहे.