डेहराडून :देशात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहाता यंदाचा कुंभमेळा कधी होईल? होईल की नाही? किती काळासाठी होईल? यावर मोठी चर्चा सुरू ...
डेहराडून :देशात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहाता यंदाचा कुंभमेळा कधी होईल? होईल की नाही? किती काळासाठी होईल? यावर मोठी चर्चा सुरू झाली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये उत्तराखंड सरकारने यंदाचा कुंभमेळा दोन महिन्यांऐवजी 48 दिवसांचाच होईल, असे सूचित केले होते. आता उत्तराखंड सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला असून हरिद्वार येथे होणारा यंदाचा कुंभमेळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 30 दिवसांचाच होणार आहे.
एक एप्रिल ते 30 एप्रिल यादरम्यान हरिद्वारमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी यंसंदर्भातली माहिती दिली असून मार्च महिना अखेरपर्यंत तारखांची घोषणा केली जाणार आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळा होत असतो. एरवी कुंभमेळा किमान दोन महिन्यांच्या कालावधीसाठी भरवला जातो; मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याची भीती लक्षात घेता कालावधी फक्त 30 दिवसांचाच ठेवण्यात आल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी दिली आहे. यासंदर्भात मार्च महिना अखेरीपर्यंत संबंधित यंत्रणांना आदेश दिले जाणार आहेत. दरम्यान, कुंभमेळ्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.