कराड / प्रतिनिधी : वृक्ष ही ऑक्सिजन देणारी मोठी सेलिब्रेटी आहे. वृक्षाला जात-पात नसते. वृक्षाशिवाय गडकोटांचे सौदर्य वाढणार नाही. छत्रपती शिव...
कराड / प्रतिनिधी : वृक्ष ही ऑक्सिजन देणारी मोठी सेलिब्रेटी आहे. वृक्षाला जात-पात नसते. वृक्षाशिवाय गडकोटांचे सौदर्य वाढणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही वृक्ष संवर्धनाबाबत मावळ्यांना विशेष सूचना केल्या होत्या. त्यामुळे गडकोटांवर वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे, हीच खरी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगड (ता. कराड) येथे पुढील आठवड्यात होणार्या शिवजयंतीचे औचित्य साधत 101 वृक्षांची लागवड करण्यात आली. हे वृक्ष अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून सदाशिवगड संवर्धनासाठी कार्यरत असणार्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानसह दुर्गप्रेमी नागरिकांना दत्तक देण्यात आले आहेत.
सयाजी शिंदे यांच्यासह राज मेडिकलचे मालक सलीम मुजावर, जयराम स्वामी वडगावच्या मठाचे मठाधिपती विठ्ठल महाराज स्वामी, दुर्गप्रेमी नगरसेवक सौरभ पाटील, अलंकार हॉटेलचे मालक दुर्गप्रेमी दिपक अरबुणे, शिवराय ट्रेकिंग ग्रुप, सुरेश जोशी, विठ्ठलराव मुळीक, कैलास कदम, दुर्गप्रेमी नागरिक, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार यांच्यासह किल्ले सदाशिवगडचे दुर्गसेवक उपस्थित होते.
प्रारंभी हजारमाची येथील पायरी मार्गापासून सदाशिवगडावरील सदाशिव मंदिरापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. वडाच्या नावाने चांगभलं, पिंपळाच्या नावाने चांगभलं, येऊन येऊन येणार कोण? झाडाशिवाय हायच कोण असा जयघोष यावेळी करण्यात आला. वृक्ष दिंडीचे गडावर आगमन झाल्यावर दुर्गप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत गडावरील सदाशिव गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणानंतर सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला सहकार्य करणार्या दुर्गप्रेमींचा अभिनेते सयाजी शिंदे यांनी गौरव केला. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला संवर्धन कार्यात सहकार्य करणार्या शिवराय ट्रेकिंग गु्रपचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवराय ट्रेकिंग ग्रुपने जिर्णोध्दार केलेल्या धुळोबा डोंगर येथील महादेव मंदिरास भेट देण्याची विनंती शिवराय ट्रेकिंग ग्रुपकडून करण्यात आली. याठिकाणी करण्यात आलेले वृक्षारोपण हे आपल्यासाठी मंदिर आहे. आपण धुळोबाला नक्की भेट देऊ, अशी ग्वाही सयाजी शिंदे यांनी दिली आहे.
विठ्ठल महाराज स्वामी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. योगेश कुंभार, आबासाहेब लोकरे यांनी स्वागत केले. सौरभ पाटील यांनी सूत्रसंचालन करताना सदाशिवगड संवर्धनाचा आढावा घेतला. तर उमेश डुबल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सदाशिवगड संवर्धन राज्यासाठी प्रेरणादायी
दुर्गप्रेमी नगरसेवक सौरभ पाटील यांनी सदाशिवगड संवर्धनासाठी केलेल्या आजवरच्या कामांची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांनी सदाशिवगड पाणी योजनेसह सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत सदाशिवगडावरील कार्य राज्यासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार अभिनेते सयाजी शिंदे यांनी काढले.