कोपरगाव शहर प्रतिनिधी/ विजय कापसे : कोपरगाव शहर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे याना काल शहरातीलच एका गुंडाने मोरे यांच्या दुकानावर जाऊन ...
कोपरगाव शहर प्रतिनिधी/ विजय कापसे : कोपरगाव शहर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे याना काल शहरातीलच एका गुंडाने मोरे यांच्या दुकानावर जाऊन कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला . मात्र मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सदर आरोपीस पकडून हत्यारासह पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत अधिक माहिती अशी कि भरत मोरे यांचे मित्र असलेले योगेश वाणी या व्यापाऱ्यास आरोपी सचिन साळवे याने खंडणी मागितल्याची आणि दिल्यास मारहाण करण्याची धमकी दिल्याची माहिती भरत मोरे यांना दिली होती. याबाबत मोरे यांनी दूरध्वनीवरून सचिन साळवे यास याची विचारणा केली असता साळवे याने मोबाईलवरच मोरे याना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आणि काही वेळातच साळवे हा कोयता हातात घेऊन मोरे यांच्या मेडिकल येथे आला आणि शिव्या देत मोरे यांच्यावर कोयत्याने वार केला . मात्र मोरे यांनी प्रसंगावधान दाखवत वार चुकविला . यावेळी तेथे हजर असलेले शहर शिवसेना प्रमुख कालविंदरसिंग डडियाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साळवे यास हत्यारासह पकडले. यानंतर संबंधितांनी याची पोलिसांना माहिती देत साळवे यास हत्यारासह पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी आरोपी साळवे याने पोलिसांसमोरच पुन्हा मोरे याना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले . परंतु त्यावर केवळ अदखलपात्र तक्रार नोंदवून आरोपीस तात्काळ सोडून दिले. तसेच तक्रारीमध्ये आरोपीकडे असलेल्या हत्याराचा कोठेही उल्लेख केला नसल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे.
साळवे हा मुळातच गुंड प्रवृत्तीचा आहे . त्याच्या विरोधात यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तसेच व्यापाऱ्यांकडून सतत खंडणी वसूल करीत असतो. असे असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता साळवे यास सोडून दिल्या बद्दल मोरे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कोपरगाव शहरामध्ये सध्या पोलिसांचा धाक न राहिल्याने गुंडगिरी वाढली असून. अश्या प्रवृत्ती विरोधात निवेदन देणाऱ्या शिवसैनिकांना पोलीस उलट दरडावतात. आणि दुसऱ्या बाजूने अशा गुंडाना मात्र मोकाट सोडतात. परंतु पोलिसांनी या गुंडांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास आम्ही शिवसेना स्टईलने या गुंडाना वठणीवर आणू असा इशारा मोरे यांनी दिला आहे.