इस्लामपूर / प्रतिनिधी : शिराळा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात धर्मवीर संभाजीराजे यांचा अश्वारूढ पुतळा, छत्रपती संभाजीराजे यांचा जन्मा...
इस्लामपूर / प्रतिनिधी : शिराळा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात धर्मवीर संभाजीराजे यांचा अश्वारूढ पुतळा, छत्रपती संभाजीराजे यांचा जन्मापासून जीवनपरिचय असा शिल्प रुपी इतिहास मांडण्यात येणार आहे. तसेच सुशोभीकरण करण्यासाठी आराखड्यास तयार मान्यता मिळाली आहे. यास लागणारा शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध होईल, अशी माहिती आ. मानसिंगराव नाईक यांनी शिराळा येथे पत्रकार परिषदेत दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खा. धैर्यशील माने, राज्य मंत्री आदीती तटकरे, संबधीत खात्याचे सचिव व अधिकारी यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या बैठकीत या निर्णय झाला. बैठकीला शिराळा नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ. सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी हेही उपस्थित होते.
या विषयावर खास बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आ. मानसिंगराव नाईक यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, शिराळा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची तटबंदी, धर्मवीर संभाजीराजे यांचा अश्वारूढ पुतळा, परिसर सुशोभीकरण येथे असलेल्या कोटेश्वर मंदीर नुतनीकरण असे नियोजन असून शिराळा नगरपंचायतीच्या दोन एकर जागेत हे उभारण्यात येणार आहे. ही उभारणी करत असताना सांगली व कोल्हापूर येथील वास्तुरचनाकार यांच्याकडून हा आराखडा तयार करण्यात येणार आहे. हे करत असताना ऐतिहासिक वातावरण जपले जाणार असून त्या पध्दतीने इमारती, रचना या वर भर दिला जाणार आहे.
आवश्यक ठिकाणी भव्य कमानी, किल्ल्यावर जाणारा मार्ग, तटबंदी, आदी प्रामुख्याने केले जाणार आहे. या किल्ल्यावर धर्मवीर संभाजीराजे यांना मुघलांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी एकमेव प्रयत्न शिराळा येथे झाला होता. हा इतिहास पुढील पिढीला माहित व्हावा म्हणून या ठिकाणी भितीवरील शिल्प चित्रे तयार केली जातील. त्याच प्रमाणे पुरातकालीन शिराळा येथील तुळजाभवानी मंदीराचा जिर्णोध्दार पुरातन पध्दतीने केला जाईल. या विषयी प्रामुख्याने माझ्याबरोबर खा. धैर्यशील माने आग्रही असून लवकरच हेही मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.