मंडई स्थालांतरीत करण्याच्या प्रश्नावरुन व्यापारी आक्रमक इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूरातील जुनी गणेश भाजी मंडईतील व्यापार्यांना नव्या छ...
मंडई स्थालांतरीत करण्याच्या प्रश्नावरुन व्यापारी आक्रमक
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूरातील जुनी गणेश भाजी मंडईतील व्यापार्यांना नव्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत हलविण्यावरून प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वाद आज शिगेला पोचला आहे. आज शनिवारी जुन्या मंडईत बसण्यास विक्रेत्यांना पोलिसांनी अटकाव केल्याने तणाव वाढला. पोलिसांनी अनधिकृतपणे प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगरल्याने विक्रेत्यांनी थेट नगरपालिका गाठली आणि पालिका इमारतीच्या आवारातच भाजी मंडई भरवली.
नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच असा हा प्रकार घडला आहे. माजी नगरसेवक कपिल ओसवाल आणि वाळवा तालुका संघर्ष समितीचे नेते शाकीर तांबोळी यांनी व्यापार्यांचे नेतृत्व करत आहेत. दरम्यान, पदाधिकारी कालपासून सुरू असलेल्या या प्रकारावर मात्र गप्प असल्याने नाराजीचा सूर आहे.
शुक्रवार, दि. 5 रोजी सकाळी मंडई परिसरामध्ये तणावाचे वातावरण झाले होते. ’आम्ही इथंच बसणार’ अशी विक्रेत्यांची भूमिका तर ’इथं बसायचे नाही’ असा पवित्रा पालिका प्रशासनाने घेतला होता. कपिल ओसवाल, शाकीर तांबोळी यांनी या निर्णयाला स्थिगीती मिळावी म्हणून विक्रेत्यांच्यावतीने प्रशासनाला विनंती केली. पण वाहतुकीला अडथळा ठरणारी जुनी मंडई नव्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज मंडईत 5 तारखेपासून सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. जुन्या जागेत बसणार्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यापासून नगरपालिका प्रशासनाने चौकाचौकात जुनी भाजी मंडई नव्या प्रशस्त जागेत 5 फेब्रुवारीपासून स्थलांतरित होणार असल्याचे फलक लावले होते. यामुळे कालपासून जुन्या मंडईत पोलीस बंदोबस्त होता. आज येथे कोणत्याही विक्रेत्यांना बसू दिले नाही. तसेच पालिकेच्या कर्मचार्यांनी काहीजणांचा भाजीपाला जप्त केला. यानंतर विक्रेत्यांना स्थलांतरित जागेत जाण्याची विनंती करण्यात आली. पण ती धुडकावत विक्रेत्यांनी थेट नगरपालिका आवारामध्ये भरवली मंडई आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी या ठिकाणी देखील भाजी खरेदीला चांगला प्रतिसाद दिला. याठिकाणी मंडई भरवल्याचे समजताच मुख्याधिकार्यांनी आपल्या कर्मचार्यांना त्याठिकाणी विक्रेत्यांची माहिती घेण्याची सूचना केली. परंतू उपस्थितांनी त्यांनाही हटकले. त्यामुळे कर्मचारी मागे हटकले.
या वादाला पार्श्वभूमी काय आहे?
शहराच्या पश्चिमेला गणेश मंदिराच्या परिसरात जुनी भाजी मंडई आहे. या मंडईला सुमारे शंभर वर्षाचा इतिहास आहे. यापूर्वी सन 2006 मध्ये ही मंडई स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केला होता. पण तेव्हा तिथे सुविधा नव्हत्या. सुविधा द्या मग जातो, असे त्यावेळी भूमिका होती. आता सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मंडई नव्या जागेतच भरेल अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. या प्रश्नावर दोन तीन दिवसांपूर्वी हेच विक्रेते पालिकेच्या आवारात आले होते. तासभर ठाण मांडून होते. शुक्रवारी पुन्हा त्यांची निराशा झाली. उद्या काय ते बघू म्हणत विक्रेते निघून गेले होते. आज सकाळी पुन्हा वाद पेटला अन् विक्रेत्यांनी थेट नगरपालिका आवार गाठले अन् मंडई भरवली आहे.
नव्या जागेवर वादावादी!
ज्याठिकाणी व्यापार्यांची व्यवस्था केली आहे त्याठिकाणी जागा अत्यंत मर्यादित आहे. शिवाय सर्वच विक्रेते बसू शकत नाहीत. आज सकाळी याठिकाणी वाहने पार्किंग करण्यावरून नागरिकांच्यात वादावादीचा प्रकार घडला. भाजी विक्रेत्यांची व्यवस्था नसताना त्यांना तिकडे स्थलांतरित करणे गैर आहे. इथल्या स्थानिक कुणाचीही तक्रार नसताना प्रशासनाने हा घाट घालू नये.
कपिल ओसवाल (माजी नगरसेवक)
छोट्या विक्रेत्यांवर गदा आणण्याचा प्रकार खपवून घेणार नाही. छोट्या विक्रेत्यांची होणारी उपासमार विचारात घेऊन आधी नव्या मंडईत पूर्ण क्षमतेने सुविधा द्याव्यात मगच स्थलांतर करावे.
शाकिर तांबोळी (जिल्हाध्यक्ष एमआयएम)