राज्य घटनेनं सर्वाना समान अधिकार आणि कायद्याचं राज्य दिलं असलं, तरी प्रत्यक्ष रोजच्या जीवनात समांतर न्यायव्यवस्था सुरू आहेत. जात पंचायतींच्य...
राज्य घटनेनं सर्वाना समान अधिकार आणि कायद्याचं राज्य दिलं असलं, तरी प्रत्यक्ष रोजच्या जीवनात समांतर न्यायव्यवस्था सुरू आहेत. जात पंचायतींच्या नावाखाली भरणारी ही अन्यायाची दुकानं बंद व्हायला तयार नाहीत. जात पंचायती मूठमाती अभियान झालं, जात पंचायतींच्या अमानुष प्रथांविरोधात कायदे झाले, तरी अन्यायाच्या दुकानांना कुणीही बंद करू शकलेलं नाही, हे वास्तव कायम आहे. या दुकानांतून दररोज हजारो सीतांना अग्निदिव्याची परीक्षा द्यावी लागते. समानतेच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या, तरी अमसानतेची बीजं इतकी रुजली आहेत, की त्याचं समूळ उच्चाटन अजून व्हायला तयार नाही.
जगातील एकही क्षेत्र असं नाही, की त्यात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला नाही. असं असलं, तरी 21 व्या शतकात महिलांना अजून समानतेची वागणूक मिळत नाही. तिला कायम दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. आपली मध्ययुगीन मानसिकता अजूनही दूर झालेली नाही. त्यातही भारतीय समाजव्यवस्थेत स्त्री अजून ही दुर्बल, शोषित आणि पीडित आहे. तिनं कितीही कुटुंबाची पणती होण्याचा प्रयत्न केला, तरी सामाजिकदृष्ट्या तिचं स्थान अजूनही खालचं कसं राहील, याचा प्रयत्न केला जात असतो. चारित्र्यावरून संशय घेऊन महिलेचा छळ करणं, तिचा खून करणं असे प्रकार तर रोजच घडतात. योनीशूचिता हा आपल्याकडं फार प्रतिष्ठेचा विषय झाला असून त्याच्या नावाखाली महिलांना कितीतरी दिव्यातून जावं लागतं. प्रगत आणि मागास अशा दोन्ही समाजघटकांची महिलांबाबतची मानसिकता सारखीच आहे. महाराष्ट्राला पुरोगामी समजलं जातं. सामाजिक सुधारणेच्या अनेक चळवळी येथे झाल्या; परंतु मध्ययुगीन मानसिकता अजूनही नष्ट करण्यात आपल्याला यश आलेलं नाही. त्यासाठी कितीही कायदे करण्यात आले, तरी त्याचाही परिणाम झालेला नाही. नाशिकची घटना त्याचंच द्योतक आहे. अर्थात चारित्र्याच्या संशयावरून सीतामाईला अग्निदिव्याला सामोरं जावं लागलं होतं. आता दररोजच अनेक सीतांना अशा अग्निदिव्यातून जावं लागतं. काही दिवसांपूर्वी ’सोशल मीडिया’वर चारित्र्याच्या संशयावरून महिलेला भीतीदायक परीक्षा द्यावी लागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जात पंचायत समितीच्या अमानवीय प्रथेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. एका समाजातील एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशा वेळी जातपंचायत विचित्र न्यायनिवाडा करून महिलेचं चारित्र्य तपासते. पतीनं तीन दगडांची चूल मांडली. सरपण लावून चूल पेटवली. चुलीवर तेल टाकलेली कढई ठेवली. तेलाला उकळी आल्यावर नवर्यानं पाच रुपयांचं नाणं त्या तेलात टाकलं व ते नाणं हातानं बाहेर काढण्यास सांगितलं. महिलेनं खूप विनंत्या, विरोध करूनही पतीनं तिचं चारित्र्य तपासण्यासाठी तेलात हात घालण्याची जबरदस्ती केली. त्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जात पंचायत समितीच्या अमानवीय प्रथेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. जात पंचायतीचे अघोरी व अन्यायी न्यायनिवाडे व शिक्षेचे प्रकार पाहण्यास मिळाले. यामध्ये विशेषतः महिला बळी पडल्याचं दिसून येत आहे. राज्यातील काही मागास समाजात महिलेला उकळत्या तेलातून नाणं बाहेर काढून चारित्र्याची परीक्षा द्यावी लागते. महिलेचा हात भाजला नाही, तर तिचं चारित्र्य शुद्ध असं समजलं जातं व हात भाजला तर चारित्र्य शुद्ध नाही, असं समजलं जातं. उकळत्या तेलात किंवा अन्य कोणत्याही द्रव पदार्थात हात किंवा शरीराचा कोणताही भाग घातला, तरी तो भाजणार हे विज्ञान आहे. शुद्ध चारित्र्य ही विज्ञानाला खोटं ठरवू शकत नाही. त्यामुळं अंधश्रद्धातून असे प्रकार होत असून जात पंचायतीविरुद्ध चार वर्षांपूर्वी कायदा करूनही फारसा फायदा झाला नाही. महिलेला चारित्र्याच्या संशयावरून जशी परीक्षा द्यावी लागते, तशी परीक्षा कधी पुरुषाला द्यावी लागत नाही. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिंग, वर्ण, जात, धर्मावरून भेद केला जाणार नसल्याचं म्हटलं असलं, तरी प्रत्यक्षात मंदिर दर्शन असो, की अन्य; महिलांवर सातत्यानं अन्याय केला जातो. नाशिकच्या अमानवीय प्रथेत सहभागी असलेल्या जात पंचायतीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. आपलं चारित्र्य शुद्ध आहे, हे सिद्ध करण्यासाठी महिलेला जीवघेणी परीक्षा द्यावी लागते. नारी चारित्र्याच्या या परीक्षा अमानुष असतात. नाशिकमधला हा प्रकार पारधी समाजातील जात पंचायतीनं केला आहे. अशा घटनांमध्ये जातपंचायत विचित्र न्यायनिवाडा करून महिलेचे चारित्र्य तपासते. तिच्यावर असलेल्या प्रचंड दबावामुळं आणि चारित्र्य शुद्ध आहे, हे सिद्ध करण्यासाठी नाईलाजानं तिनं अखेर उकळत्या तेलात हात घालून नाणं बाहेर काढलं. अशा अमानुष न्यायनिवाड्याला बळी पडून महिलेनं उकळत्या तेलात हात घातला आणि तिचा हात भाजला. या महिलेचा हात भाजला नाही तर तिचं चारित्र्य शुद्ध, असा अजब न्याय पंचायतीनं लावला होता. भटक्या समाजात महिलांवरील अत्याचाराला मर्यादाच नसतात. नवरा तुरुंगातून परतला, की त्याच्या पत्नीला अग्निदिव्यातून जावं लागतं. जातपंचायतीच्या भीषण शिक्षा असत आणि बहुतांश महिलांचे उजवे हात कायम भाजलेले असतात. उकळत्या तेलात टाकलेलं नाणं तिनं काढायचे आणि तिचा हात भाजला तर तिला दोषी ठरवून अतर्क्य शिक्षा दिल्या जातात. उच्चजातीय पुरुषांच्या डोळयात आपल्या स्त्रिया येवू नयेत, म्हणून त्यांना आंघोळ करू दिली जात नाही. केस विंचरु दिले जात नाही. स्त्रीनं आंघोळ केल्यास मारहाण केली जाते. याशिवाय त्यांच्याकडं पर्यायही नसतो. स्वजातीय पुरुष तर वेळोवेळी, दररोज स्त्रियांना दारु पिवून जीव जाईपर्यंत मारतात. ते मारणं अत्यंत निर्दयी, अमानुष असतं. जातपंचायतही हेच पुरुष वर्चस्ववादी वर्तन करून स्त्रियांना ओलिस ठेवून घेवून बलात्कार करण्यापर्यंत जातं. एकानं दुसर्याच्या बायकोवर बलात्कार केल्यास बदला म्हणून दुसर्यानंसुद्धा त्याच्या बायकोवर बलात्कार करण्याची शिक्षा जातपंचायत सुनावते आणि ती अंमलातही आणली जाते. यात दोनही बाजूनं स्त्रीची अवहेलना आणि दमनच आहे. अशाप्रसंगी इतर स्त्रियांना बघ्याच्या भूमिकेशिवाय काहीच करता येत नाही, इतक्या त्या गुलाम आहेत. लोकांच्या मनावरील जळमटे दूर करण्यासाठी, परंपरेला घट्ट चिटकून राहण्याची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. कौमार्य चाचणीसारख्या अनिष्ट प्रथांविरुद्धचा लढा समाजाच्या बुरसटलेल्या मानसिकतेविरुद्ध आहे. समाज शिक्षित झाला आहे, सुशिक्षित नाही. अशिक्षित, अल्पशिक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जात पंचायतीच्या दबावाला बळी पडतात, हे एक वेळ समजू शकतो. आजपर्यंतच्या उघड झालेल्या घटनांमधील पीडित मुली, त्यांचे पालक हे अल्पशिक्षित होते, आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते. त्यामुळं जातपंचायतीस विरोध करण्याची, त्याविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद त्यांच्याकडं नसेलही; पण उच्चशिक्षित, उच्च पदस्थ, व्यावसायिक, उद्योजक असणारे पालक आणि विदेशात शिकलेली मुलं अशा अनिष्ट प्रथेला बळी पडतात. कौमार्य चाचणी ही स्त्रीच्या मानवी हक्कांचं, मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे. त्याचबरोबर ते अमानुष असून, तो स्त्रीत्वाचा अपमान आहे. स्त्री ही काचेचं भांडं आहे, अशी नेहमीच उपमा दिली जाती. स्त्रीची इज्जत, चारित्र्य या कल्पना तिच्या स्त्रीत्वाभोवतीच फिरतात. तिच्या चारित्र्यास, इज्जतीस धक्का पोहोचणं, म्हणजे तिच्या पतीशिवाय इतर पुरुषाशी तिचे शारीरिक संबंध येणं. मग हे तिच्या इच्छेनं असो किंवा इच्छेविरुद्ध असो; पर पुरुषाशी शारीरिक संबंध आल्यास तिच्या चारित्र्यास, इज्जतीस तडा गेला असं समजलं जातं. यातील दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे चारित्र्य ही तिची एकटीची बाब नसते, तर ते तिच्याबरोबर तिच्या कुटुंबाशी जोडलं जातं. कौमार्य शाबूत असणं, म्हणजे मुलीनं तिच्या आई-वडिलांची, खानदानाची इज्जत राखली, असं समजलं जातं. त्यामुळे तिच्या कुटुंबासाठी तिचं लैंगिक दृष्टीनं संरक्षण हे अत्यंत जबाबदारीचे कर्तव्य बनतं. स्त्रीचं कौमार्य इतर अनेक कारणांनी जाऊ शकतं, हे मानायला ही मंडळी तयार नाहीत. स्त्री ही वस्तू नसून एक व्यक्ती आहे. तिला मन आहे, भावना आहेत, विचार आहेत, मुळात ती माणूस आहे, हे मुद्दे या अमानुष प्रथा, परंपरा पाळणार्या व्यक्ती पूर्णतः विसरल्या आहेत. कौमार्य चाचणी स्त्रियांनाच लागू आहे. कोणत्याही समाजात पुरुषांना हे कधीच विचारलं जात नाही. अगदी पुराणांतील दाखले काढले, तरी स्त्रीचं चारित्र्य आणि तिचं पावित्र्य हे फक्त तिच्या योनीभोवतीच फिरताना दिसतं. विविध सामाजिक समस्यांवर, प्रश्नांवर कायदा हे एक उत्तर आहे; पण तो अंतिम आणि प्रभावी उपाय नाही, हेही तितकंच खरं. लोकांच्या मनावरील जळमटं दूर करण्यासाठी, परंपरेला घट्ट चिटकून राहण्याची मानसिकता बदलणं गरजेचं आहे.