सुपने येथे ऐतिहासिक समाधीचा ग्रामस्थांकडून स्थानांचा शोध कराड / प्रतिनिधी ः सुपने (ता. कराड) येथे कमीत-कमी सातशे ते आठशे वर्षांचा इतिहास व...
सुपने येथे ऐतिहासिक समाधीचा ग्रामस्थांकडून स्थानांचा शोध
कराड / प्रतिनिधी ः सुपने (ता. कराड) येथे कमीत-कमी सातशे ते आठशे वर्षांचा इतिहास व वारसा असणार्या गावात जुने गावठाण येथे तत्कालीन वेशीलगत व महादेव मंदिर परिसरात 9 ते 10 समाधी स्थाने असल्याचा शोध घेतला आहे. सन 1967 च्या विनाशकारी भूकंपाने गावचे सध्याच्या नवीन गावठाणात पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे ही समाधी स्थाने दुर्लक्षित झाली होती. तसेच बहुतांश ग्रामस्थ याबाबत अनभिज्ञ असल्याने समाधिस्थान परिसरात झाडेझुडपे वाढल्याने काही समाध्या उध्वस्त व नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
सुपनेचे इतिहास प्रेमी व दुर्गप्रेमी स्वातंत्र्य सैनिक जगन्नाथराव पाटील फौंडेशनचे शिवाजी पाटील यांच्या इतिहास संशोधकांच्या संपर्कामुळे व त्यांच्या मार्गदर्शनामुळे या दुर्लक्षित समाधी स्थानाकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इतिहास संशोधक यांनी सुपने गावाला समधीस स्थाने पाहण्यासाठी भेट दिली. यादरम्यान प्रथम सर्व समधीस्थानांची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर काही समाधी भोवती उत्खनन केले असता, या समाधीवर शिलालेख व राजचिन्हे आढळून आली आहेत. या समाधी इतिहासात रणांगणावर पराक्रम गाजवलेल्या तसेच धारातीर्थी पडलेल्या वीर पुरुषांच्या असल्याचे सिध्द होत आहे. महादेव मंदिर परिसरात अनेक विरगळी तसेच सतीशीला आहेत. यावरून सुपने गावाला शेकडो वर्षांचा दैदीप्यमान इतिहास असल्याचे उघड झाले आहे. हा ऐतिहासिक ठेवा व वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी आता ग्रामस्थ व तरुण सरसावले असून इतिहास संशोधक यांच्या सहकार्याने ऐतिहासिक संदर्भ, पुरावे, कागदपत्रे यांचाही शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यावेळी शिवाजी पाटील, सुहास पाटील, बजरंग पाटील, सत्यजित पाटील, नितिन पाटील, विराज पवार यांनी या परिसरातील स्वच्छता केली.
सुपने येथे इतिहास संशोधकांनी भेट दिली आहे. येथे असलेल्या समाधी या शेकडो वर्षापूर्वीच्या आहेत. तरूणांनी या परिसरातील स्वच्छता केलेली असून सापडलेल्या इतिहासकालीन वास्तूची जपणूक केली जाणार आहे. आम्ही पुरातत्व विभागाशी आम्ही संपर्कात आहे. भविष्यात सुपने गावचा गौरवशाली इतिहास समाजापुढे आणण्यात येईल.
श्री. शिवाजी पाटील, दुर्गप्रेमी (रा. सुपने, ता. कराड)