खंडाळा / प्रतिनिधी : खंडाळा तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू अड्ड्यांवर छापा टाकून खंडाळा व सातारा तालुक्यांतील चार जणांना नुकतीच...
खंडाळा / प्रतिनिधी : खंडाळा तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू अड्ड्यांवर छापा टाकून खंडाळा व सातारा तालुक्यांतील चार जणांना नुकतीच अटक केली. 6 लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक अनिल चासकर यांनी दिली.
खंडाळा तालुक्यातील शेखमीरवाडी, शिरवळ, असवली येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गावठी दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून 6 लाख 19 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या छाप्यात चारजणांना अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र राजेंद्र कुंभार (रा. शेखमिरेवाडी, ता. खंडाळा) आदेश अनिल कुंभार (रा. धनगरवाडी, ता. खंडाळा) राहुल संजय पवार (रा. लिंब, ता. सातारा), वैभव संजय सोनमळे (रा. लिंब, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा विभागातील भरारी पथकाने विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार व अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेखमिरेवाडी, शिरवळ व असवली याठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी दारूविक्री व वाहतुकीवर छापे टाकले. या छाप्यात एक चारचाकी, एक दुचाकीसह 703 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 6 लाख 19 हजार 290 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. सुरेंद्र राजेंद्र कुंभार, आदेश अनिल कुंभार, राहुल संजय पवार आणि वैभव संजय सोनमळे यांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये निरीक्षक आर. एल. पुजारी, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, अजित रसाळ, सचिन खाडे, महेश मोहिते, संतोष निकम, जीवन शिर्के, नितीन जाधव, किरण जंगम यांनी भाग घेतला. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर करत आहेत.