गोंदिया/प्रतिनिधी: मनोहर भाई पटेल यांच्याप्रमाणे मीदेखील शेकडो शाळा उघडल्या; मात्र आपल्या वडिलांचे शाळांना नाव दिले नाही, असा टोला राज्यपाल...
गोंदिया/प्रतिनिधी: मनोहर भाई पटेल यांच्याप्रमाणे मीदेखील शेकडो शाळा उघडल्या; मात्र आपल्या वडिलांचे शाळांना नाव दिले नाही, असा टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रफुल पटेल यांना लगावला. पटेल हे मोदी यांच्या कानमंत्रावर चालत असल्याचे सांगत त्यांनी एकच खळबळ उडवून दिली.
गोंदिया जिल्ह्याचे शिक्षणमहर्षी मनोहर भाई पटेल यांच्या 115 व्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला कोश्यारी यांनी उपस्थिती लावली, त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल पटेल यांच्यावर निशाणा साधला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 19 प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा कोश्यारी आणि पटेल यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गोंदियात सत्कार करण्यात आला. कोश्यारी यांनी आपल्या भाषणातून पटेल यांना चिमटे काढले. स्वर्गीय मनोहरभाई पटेल हे स्वतः अशिक्षित असताना त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी एकाच दिवशी 22 शाळा उघडल्या, त्यानंतर दोन्ही जिल्ह्यात शेकडो शाळा, महाविद्यालये उघडली गेली. गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता इतर ठिकाणी जावे लागत नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृतिनिमित्त नऊ फेब्रुवारीला गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत असतो.