राज्यातील महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असं चित्र नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आणण्याचा प्रयत्न आमदार राधाकृष्ण विखे यांनी वि...
राज्यातील महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असं चित्र नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आणण्याचा प्रयत्न आमदार राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करून पाहिला; परंतु विखे यांच्याबरोबर मुंबईला गेलेल्या नेत्यांचाही विखे यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापुढं विखेे यांचं काहीच चाललं नाही; उलट, भाजपच्या नेत्यांनीही थोरात यांच्यांशी सलगी करून जिल्हा बँकेतला प्रवास सुकर केला. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पक्षीय जोडे बाजूला ठेवायचे असतात, याचं भान नगर जिल्ह्यातील नेत्यांना आहे. विखे यांनी ते भान ठेवलं नाही.
भारतीय जनता पक्षाचं स्वतंत्र पॅनेल निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यापूर्वी बँकेवर के. बी. रोहमारे, शंकरराव काळे, आबासाहेब निंबाळकर, मारूतराव घुले, भाऊसाहेब थोरात या नेत्यांचं वर्चस्व राहिलं. त्या वेळीही बाळासाहेब विखे जिल्हा बँकेच्या राजकारणात एकाकी पडत होते. दोन्ही काँग्रेसच्या विचारांचं बँकेचं बहुमत असताना राधाकृष्ण विखे यांना बँकेचं अध्यक्षपद मिळालं होतं. गेल्या काही वर्षांत जिल्हा बँकेचं नेतृत्व थोरात यांच्याकडं आलं असलं, तरी बँकेत काँग्रेसच्या संचालकांची संख्या कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांची संख्या जास्त असते. त्यातून काही काळ अध्यक्षपद, तर काही काळ उपाध्यक्षपद पदरात पाडून घेण्यात त्यांना यश येत असतं. आताही जिल्हा बँकेत आता शिवसेनेचा चंचुप्रवेश झाला असला, तरी शंकरराव गडाख पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांचे वडील यशवंतराव गडाख यांनी जिल्हा बँकेचं नेतृत्व केलं होतं. ते राज्य सहकारी बँकेचेही संचालक होते. पक्षीय विचारांना जिल्हा बँकेत स्थान नसलं, तरी ठराविक घराण्यातील दुसर्या, तिसर्या पिढ्या बँकेत प्रतिनिधित्त्व करीत आहेत. सामान्यांना फार कमी प्रतिनिधित्त्व बँकेत मिळतं. आता बँकेच्या बिनविरोध निवड झालेल्या संचालकांच्या नावावर नजर टाकली, तरी शंकरराव काळे यांच्या घरातील चौघांना आतापर्यंत बँकेत संधी मिळाली. शंकरराव कोल्हे यांच्या घरातील तिघांना, मारुतराव घुले कुटुंबातील तिघांना, फिरोदिया कुटुंबातील दोघांना, गडाख कुटुंबातील दोघांना, तनपुरे कुटुंबातील दोघांना, कुंडलिकराव जगताप कुटुंबातील दोघांना, नागवडे कुटुंबातील तिघांना, राळेभात कुटुंबातील दोघांना, राजळे कुटुंबातील दोघांना बँकेच्या संचालकपदाची संधी मिळाली. असं असलं, तरी या कुटुंबातील फारच कमी लोकांना अध्यक्ष होता आलं. नेत्यांनी कार्यकर्त्यांना अध्यक्ष केलं. जिल्हा बँकेत महिला संचालक असल्या, तरी त्यापैकी पदाधिकारी होण्याची संधी फारशी कुणालाच मिळाली नाही, हे पुरोगामी जिल्ह्यांच्या दृष्टीनं चांगलं नाही. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी 17 जागांवर बिनविरोध निवडी झाल्या आहेत तर चार जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया अद्याप बाकी असली, तरी बिनविरोध झालेल्या जागा व त्यावर काँग्रेसचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीनं मिळवलेलं वर्चस्व पाहता बँक थोरात गटाच्या ताब्यात आली आहे. विखे यांनी काँग्रेसमध्ये असतानाही भाजपला हाताशी धरून निवडणुकीत पॅनेल उतरविले होते. त्या वेळीही त्यांच्या गटाला पाचपेक्षा जास्त जागा मिळाल्या नव्हत्या. आता विखे यांच्या गटाचे दोन संचालक निवडून आले असले, तरी त्यातील एकाच्या विजयाला राष्ट्रवादी काँग्रेसनं हातभार लावला आहे. त्यामुळे अण्णासाहेब म्हस्के वगळता विखे यांच्या गटाला फारसं यश आलेलं नाही. थोरात यांच्या बाजूनं राहूनही शिवाजीराव कर्डिले यांना महाविकास आघाडीतील शिवसेनेमुळं निवडणुकीला सामोरं जावं लागतं आहे. शेवटच्या दिवशी कर्डिले विखे यांच्यासोबत होते. त्यामुळं ते निवडून आले, तरी विखे गटाच्या संचालकात आणखी एकाची भर पडेल. कर्जत तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत थोरात आणि विखे गटांत लढत होत आहे. तिथला निकाल काहीही लागला, तरी विखे गटाच्या संचालकांची संख्या पाचच्या पुढं जात नाही. आता भाजपच्या संचालकांची संख्या पाच असली, तरी त्यातील तिघे थोरात गटाचे आहेत. पारनेर तालुक्यातून अॅड. उदय शेळके यांच्या निवडीची जास्त शक्यता आहे. रामदास भोसले त्यांच्याविरोधात लढत असले, तरी दहा मतदार वगळले, तर उर्वरित सर्व मतदार शेळके यांच्यासोबतच्या बैठकीला हजर होते. बँकेचे विद्यमान संचालक दत्ता पानसरे यांच्याविरोधात पारनेर बाजार समितीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्यातील लढतीतही गायकवाड यांचे पारडे जड आहे. ते निवडून आले, तर वडील सबाजी गायकवाड यांच्यानंतर ते गायकवाड कुटुंबातील तिसरे संचालक ठरतील. तसंच नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांत पारनेरचे तीन संचालक होतील. श्रीगोंदे, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, कर्जत या तालुक्यांना दोन दोन संचालक मिळाले आहेत. पानसरे निवडून आले, तर मात्र श्रीगोंदे तालुक्याचे तीन संचालक होतील. निवडणूक जरी जिल्हा बँकेची असली तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याच्या शल्याचे आणि पराभवाचे वचपे बँकेच्या निवडणुकीत काढले गेल्यानं निवडणूक रंगतदार झाली. विखे यांची साथ सोडल्याचा फायदा भांगरे कुटुंबाला झाला. अशोक भांगरे यांचे चिरंजीव अमित बँकेचे संचालक झाले. तसंच करण ससाणे यांनीही विखे यांची साथ सोडल्यानं त्यांच्या गळ्यात वडील जयंत ससाणे यांच्यानंतर संचालकपदाची माळ पडली. सीताराम गायकर यांनी पिचड यांची साथ सोडल्यानं त्यांनाही पुन्हा संचालक होता आलं. अगस्ती साखर कारखान्याची निवडणूक आता प्रतिष्ठेची झाली आहे. दशरथ सावंत यांच्यासारख्यांना त्यासाठी थांबावं लागलं. वैभव पिचड यांच्या हातातून अगोदर आमदारकी गेली. त्यानंतर जिल्हा बँकेचं पदही मिळवता आलं नाही. बँकेची यंदाची निवडणूक आणखी एका वेगळ्या कारणासाठी ओळखली जाणार आहे, ती म्हणजे बँकेत अनेक तरुण चेहरे, विशेषत: जिल्ह्याच्या सहकारात दिग्गज असलेल्या नेत्यांची मुलं बँकेत संचालक म्हणून दाखल झाली आहेत. विखे भाजपत आल्यानंतर भाजपचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला. बबनराव पाचपुते, मोनिका राजळे स्वबळावर निवडून आले. स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, शिवाजीराव कर्डिले, प्रा. राम शिंदे यांनी भाजपश्रेष्ठींकडं विखे यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्याची आठवण भाजपच्या नेत्यांना आहे. त्यामुळं तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीला हजर राहिल्यानंतर या नेत्यांनी विखे यांच्यासोबत जाण्याऐवजी थोरात यांच्यासोबत जाणं पसंत केलं. प्रा. शिंदे तर निवडणुकीपासून दूर राहिले. जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी एकत्रितपणे पॅनल म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु तो प्रत्यक्षात आला नाही. शिवसेनेच्या हाती फारसं काही लागलं नाही. त्याचं कारण या पक्षाचं सहकारात फारसं स्थान नाही. माजी आमदार भानुदास मुरकुटे अखेरच्या वेळी विखे यांची संगत सोडून थोरातांना मिळाले. त्याचा त्यांना फायदा झाला. थोरात यांनी सांगितल्याप्रमाणं जिल्हा बँकेत पक्षीय राजकारणाला स्थान नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांची संख्या आठ होण्याची शक्यता असून काँग्रेसच्या संचालकांची संख्या पाच होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा सदस्य महाविकास आघाडीबरोबरच आहे. त्यामुळं थोरात यांच्या अंदाजानुसार जिल्हा बँकेचं अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद दोन्ही काँग्रेसकडंच जाईल.