अहमदनगर/प्रतिनिधीः शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, महापालिकेने दोन कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याची तयारी सुरू के...
अहमदनगर/प्रतिनिधीः शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, महापालिकेने दोन कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याची तयारी सुरू केली आहे. नगर शहरापाठोपाठ पारनेर, संगमनेर आणि राहाता तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली असून तिथेही कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी कोरोना बाधितांची जिल्ह्यातील दररोजची संख्येने शंभरी ओलांडायला सुरुवात केली. बाधितांची संख्या आणि रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात तफावत पडल्याने पुन्हा एकदा अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा आकडा पार केला. अहमदनगर शहर आणि संगमनेर पूर्वी कोरोनाबाधितांच्या संख्येत आघाडीवर होते; परंतु आता नगर शहरापाठोपाठ पारनेर तालुका आघाडीवर आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा रुग्णालयांतील खाटांवर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी ठिकठिकाणाहून येत आहे. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जिल्ह्यात सर्वांत अगोदर कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती.
जिल्ह्यात सोमवारी 178 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यात 53 रुग्ण नगर शहरातील होते. ही बाब गांभीर्याने घेत महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे. टाळेबंदी शिथिल होताच नागरिकांनी सामाजिक अंतराचे भान ठेवले नाही. त्यातच सतत बदलणार्या हवामानामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. शहरात मुखपट्टी न लावता फिरणार्यांवर कारवाई करण्यासाठी पथके तैनात केली आहेत. टाळेबंदी काळात महापालिकेने शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी कोविड सेंटर सुरू केली होती; मात्र रुग्णांचे प्रमाण कमी होऊ लागल्याने व कोविड सेंटरमध्ये रुग्ण उपचार घेण्यासाठी येण्याचे प्रमाण घटल्याने ती बंद केली होती. आता रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्याने नटराज हॉटेलमधील व जैन पितळे बोर्डिंगमधील कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. यातील जैन पितळे बोर्डिंगमधील कोविड सेंटर केवळ महिलांसाठी असणार आहे. त्याची क्षमता सत्तर खाटांची आहे, तर नटराज सेंटरची क्षमता शंभर खाटांची आहे. महापालिका प्रशासनाने पुरेशी औषधे व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. लवकरच या सेंटरचे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. आगामी दोन दिवसांत ती सुरू होतील, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात 178 बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 74 हजार 638 झाली आहे. दोन रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने, मृतांची संख्या 1124 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख एक हजार 63 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. त्यांपैकी 18.61 टक्के जण बाधित आढळून आले. बाधितांपैकी मृत्युमुखी पडणार्यांचे प्रमाण 1.51 टक्के आहे. कालच्या बाधितांमध्ये नगरमध्ये सर्वाधिक 53 रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल पारनेर 29, राहाता 19, संगमनेर 15, नगर तालुका 13, श्रीगोंदे 9, श्रीरामपूर 8, कोपरगाव व पाथर्डी प्रत्येकी 6, जामखेड 5, कर्जत व राहुरी प्रत्येकी 3, शेवगाव 2, नेवासे 2, तसेच अकोले येथील एका रुग्णाचा समावेश आहे. परजिल्ह्यांतील 4 रुग्ण आहेत.