जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला घरचा आहेर औंध / वार्ताहर : सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग (दक्षिण) आणि शिक्षण विभागात खाजगी व्यक्ती शासकीय ...
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला घरचा आहेर
औंध / वार्ताहर : सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग (दक्षिण) आणि शिक्षण विभागात खाजगी व्यक्ती शासकीय ओळखपत्र लावून काम करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत माजी समाजकल्याण सभापती व औंध गटाचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सर्वगोड यांनी केली होती. यावर अद्याप कारवाई झाली नसल्याने 19 फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषणाचा इशारा सर्वगोड यांनी दिला.
सर्वगोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 8 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बांधकाम विभाग (दक्षिण) आणि शिक्षण विभागात काही काही खाजगी व्यक्ती शासकीय ओळखपत्र लावून काम करत आहेत. हा मुद्दा उपस्थित करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, दोन महिने उलटले तरी अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली दिसून येत नाही. 18 फेब्रुवारी अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई न केल्यास 19 फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण करणार आहे. असा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांना निवेदनाची प्रत दिल्याची माहिती सर्वगोड यांनी दिली.