मुंबई/ प्रतिनिधीः कोरेगाव भीमा हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध प्रकरणी अटकेत असलेले 82 वर्षीय ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च ...
मुंबई/ प्रतिनिधीः कोरेगाव भीमा हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध प्रकरणी अटकेत असलेले 82 वर्षीय ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन हमीदारांच्या अटीवर सहा महिन्यांसाठी त्यांना जामीन देण्यात आला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद- माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील 16 आरोपींपैकी तात्पुरत्या जामिनाचा दिलासा मिळालेले राव हे पहिलेच आरोपी आहेत.
वरवरा राव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तळोजा तुरुंग रुग्णालयातील परिस्थिती आणि आरोपीची प्रकृती लक्षात घेता त्याला जामिनाचा अंतरिम दिलासा दिला नाही, तर आरोपीच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्याच्या आमच्या कर्तव्यात कसूर होईल, असे निरीक्षण न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे. तसेच, राव यांची प्रकृती खालावली असल्याचे त्यांच्या सर्व वैद्यकीय अहवालांतून स्पष्ट होते, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. राव यांना तीन आठवड्यांसाठी नानावटी रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात येऊ नये, अशी विनंती एनआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी केली होती; मात्र उच्च न्यायालयाने ती फेटाळली आहे. तसेच, सहा महिन्यांनंतर राव यांनी तळोजा तुरुंगात परतावे किंवा तेव्हाच्या प्रकृती परिस्थितीनुसार जामिनाच्या मुदतीत वाढ करण्याचा पर्यायही न्यायालयाने दिला आहे. राव यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने अनेक अटी घातल्या आहेत. राव यांनी मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाच्या हद्दीच्या बाहेर कधीही जाऊ नये, खटल्याच्या सुनावणीला नियमित हजेरी लावावी, राव यांनी या प्रकरणाशी माध्यमांशी काहीही बोलायचे नाही आणि लिहायचे नाही, सोशल मीडियावरही याविषयी व्यक्त व्हायचे नाही अशा अटी आहेत.