नातेपुते / प्रतिनिधी : इंग्रजांच्या काळामध्ये म्हणजे सन 1928 मध्ये लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्ग मंजूर झाला. सर्वेक्षण झाले आहे. या रेल्वे मार्ग...
नातेपुते / प्रतिनिधी : इंग्रजांच्या काळामध्ये म्हणजे सन 1928 मध्ये लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्ग मंजूर झाला. सर्वेक्षण झाले आहे. या रेल्वे मार्गासाठी लागणारी शेतजमीन रेल्वेस्थानक आणि डेपोसाठी लागणाच्या जागेच्या मालकी सदरी भारत भारत सरकार, रेल्वे खाते असे नाव आजही कायम असताना, या भागातील राजकीय नेतृत्व दिल्ली दरबारी कमी पडल्यामुळे 100 वर्षे झाले रेल्वेमार्ग होऊ शकलेला नाही.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पश्चिम भागातील नेते बाबाराजे देशमुख म्हणाले, मी व विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना घेऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी बैठक लावून जुन्या भूसंपादनानुसारच रेल्वेमार्ग होण्याचा प्रयत्न करणार आहोत. असाच प्रयत्न रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सोमनाथ वाघमोडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, लोणंद ते फलटण या मार्गावर रेल्वे रूळ टाकून मार्ग तयार झाला आहे. माजी खासदार कै. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नाने रेल्वे मार्गावर चाचणी घेतली होती. परंतू नियमितपणे रेल्वे गाडी सुरू झाली नाही. लोणंद-फलटण-बारामती-दौंड या सर्व घडामोडींमुळे मूळच्या लोणंद-पंढरपूर मार्गासाठी खंबीर नेते नसल्याने हे काम 100 वर्षे रखडले आहे.
आता फक्त फलटण ते पंढरपूर एवढेच काम बाकी आहे. ते जुन्या नकाशानुसार आणि जुन्या भूसंपादनातून होणे गरजेचे आहे. 100 वर्षानंतर या रेल्वेमार्गाबद्दल जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार अॅड. रामहरी रूपनवर, रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सोमनाथ वाघमोडे, सचिव भानुदास सालगुडे पाटील, विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आदींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व आपापल्या ताकदीनुसार 100 वर्षांनंतर या रेल्वेमार्गाचे पुन्हा सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षण सुरू झाल्याचा आनंद होतो आहे. या भागातील जनतेला नक्कीच आनंदाची व सुखद भावना आहे. मात्र, दुर्दैव काही पाठ सोडत नाही. सर्वेक्षण करणार्या प्रणिती इंजिनिअरिंग कंपनीस रेल्वे खात्याने गूगलवरून मापे दिली आहेत. ती नवीन सर्वेक्षण जुन्या रेल्वे मार्गानुसार होताना दिसत नाही. माळशिरस तालुक्यातील बहुतेक रेल्वेमार्ग गावाच्या कडेकडेने जाताना दिसत आहे. नवीन रेल्वे मार्गावर लाखो रुपयांचे बंगले उभे आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई कोट्यवधी रुपये रेल्वे खात्याला द्यावी लागणार आहे. सन 1928 मध्ये रेल्वे खात्याने ज्या जमिनीचे भूसंपादन केले आहे, त्याच मार्गाने रेल्वे जाणे गरजेचे आहे. नातेपुते येथे विद्युत मंडळाच्या लगत जुना रेल्वेमार्ग आहे. डॉ. बा. ज. दाते प्रशालेच्या पूर्वेला गणगे वस्ती जवळ 25 एकर क्षेत्रामध्ये रेल्वे स्थानक, मालासाठी डेपो यासाठी जागा राखीव आहे.