पुणे/प्रतिनिधीः टाळेबंदी काळात आलेली वाढीव विजबीले भरण्यासाठी राज्य महावितरण कंपनीकडून ग्राहकांच्या मागे तगादा लावला जात आहे. याविरोधात भाजप...
पुणे/प्रतिनिधीः टाळेबंदी काळात आलेली वाढीव विजबीले भरण्यासाठी राज्य महावितरण कंपनीकडून ग्राहकांच्या मागे तगादा लावला जात आहे. याविरोधात भाजपने आज राज्यभर आंदोलन केले. पुण्यातही भाजप कसबा मतदारसंघाच्यावतीने सदाशिव पेठेतील पेशवे पार्क येथे महावितरणाच्या उपविभागीय कार्यालयासमोर टाळेठोक आंदोलन करण्यात आले.
टाळेबंदीमध्ये राज्यातील जनतेला महावितरण कार्यालयाकडून वाढीव वीज बील पाठवण्यात आले. यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलात सवलत देऊन राज्यातील जनतेची दिवाळी गोड करू, असे म्हटले होते; मात्र प्रत्यक्षात वाढीव वीज बिलात सवलत देण्यात आली नाही. उलट वीज बिल भरा अन्यथा वीज कापण्यात येईल, असे धमकीपत्र महावितारणाकडून पाठवण्यात आले. महाविकास आघाडी सरकार आणि महावितरणाच्या या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राज्यभर भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. टाळेबंदीमुळे जनता त्रस्त होती आता विजेचे झटके देऊन महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील जनतेला आणखी त्रास देण्याचे काम केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या कृत्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो, असे मत कसबा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी व्यक्त केले.
कसबा विधानसभा मतदार संघाच्यावतीने महावितरणच्या कार्यालयाला तब्बल दोन फुटी टाळे लावण्यात आले. आतापर्यंत चार वेळा आंदोलन करण्यात आले आहे. सरकारने आता जर वीज बील माफ केले नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.