मुंबई/प्रतिनिधी: राज्यातील ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. ठराविक दिवसांनी सरकार विरुद्ध राज्यपा...
मुंबई/प्रतिनिधी: राज्यातील ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. ठराविक दिवसांनी सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने एक दिवस अगोदरच सरकारी विमान उपलब्ध नसल्याचे राजभवनाला कळवूनही त्याबाबत राज्यपाल अंधारात राहिल्याने त्यांना विमानातून उतरावे लागले. त्यांच्यावर राजभवनानर परत येण्याची नामुष्की आली. त्यानंतर खासगी विमानाने ते मसुरीला रवाना झाले.
राज्यपालांना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अॅकेडमीच्या सांगता समारोपाला जायचे होते. आठवड्यापूर्वी राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यलयाला परवानगी मागितली होती. मुख्यमंत्री कार्यलयाने बुधवारीच सरकारी विमान उपलब्ध नसल्याचे कळविले. राजभवनातून राज्यपालांना त्याची माहिती दिली गेली नाही. राज्यपाल त्यामुळे विमानात जाऊन बसले. सरकारी विमान वापरायला परवानगी नसल्याने त्यांना विमानातून उतरून, दुसर्या खासगी विमानाने जावे लागले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, की हा सगळा प्रकार दुर्दैवी आहे. कुणाची खासगी मालमत्ता नाही. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती करतात. राज्यपालांना कुठे जायचे असेल तर ते मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहितात, ते त्याबाबत ऑर्डर काढतात. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके इगो असलेले सरकार मी पाहिले नव्हते. आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळाले पाहिजे. राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाने त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तरीही राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने त्यावरून राजकारण सुरू केले आहे. राज्यपालांना विमान सरकारच्या माध्यमातून नाकारले असेल तर हे दमनकारी आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणे योग्य नाही. सरकारकडून असे घडले असेल, तर त्यांनी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकार्याकडून हे घडले असेल, तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
अजित पवार अनभिज्ञ
मला याबाबत काहीच माहिती नाही. आता तुमच्याशी बोलल्यानंतर मला ही घटना कळली. माहिती घेऊन या घटनेवर बोलेन, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यावर वारंवार प्रश्न विचारल्यानंतर अजितदादा पत्रकारांवर भडकले.
राज्यपालांना विमान देणे बंधनकारक नाही
विमान उड्डाणास सक्षम आहे, की नाही यासंदर्भात पुरेपूर माहिती नव्हती. त्यामुळे कदाचित परवानगी दिली नसेल. परवानगी नसताना तांत्रिकदृष्ट्या प्रवास करणे योग्य नाही. हे विमान महाराष्ट्र सरकारचे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते वापरू शकतात. इतरांना ते वापरायचे असेल, तर त्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. इतरांना ते विमान देणे सक्तीचे नाही, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.