आता कुठंही काही खट्टू झालं, की ती घटना जगाच्या एका कोपर्यापुरती मर्यादित राहत नाही. ती जगात सर्वत्र पसरते. अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपूर...
आता कुठंही काही खट्टू झालं, की ती घटना जगाच्या एका कोपर्यापुरती मर्यादित राहत नाही. ती जगात सर्वत्र पसरते. अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपूर्वी कृष्णवर्णीय नागरिकाला झालेली मारहाण आणि त्यानंतर जगभर त्याचे उमटलेले प्रतिसाद पाहता शेतकर्यांचं आंदोलनही भारतापुरतं मर्यादित राहील, हे सरकारनं गृहीत धरणं चुकीचंच आहे. आता जगभरात सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलकांना दिलेला पाठिंबा, केेलेलं ट्वीट देशविरोधी वाटायला लागलं आहे.
अमेरिकेत मागच्या काही महिन्यांपूर्वी कृष्णवर्णीय नागरिकाला झालेली मारहाण हा त्या देशाच्या अंतर्गत विषय असला, तरी त्याचे पडसाद जगभर उमटले होते. जगभर मोर्चे निघाले. अगदी भारतातही मोर्चा निघाला होता. ब्रिटनमध्ये तर श्वेतवर्णीयांविरोधात मोठं आंदोलनं झालं होतं. भारतात शेतकरी आंदोलन सुरू झाल्यापासून परदेशातून त्याला पाठिंबा मिळतो आहे. भारतातील आंदोलनात परदेशी नागरिकांनी नाक खुपसायचं काहीच कारण नाही, असं म्हणून चालत नसतं. कोणत्याही देशातील वाद हा आता त्या देशापुरता मर्यादित राहत नाही. भारतातील शेतकरी आंदोलनाबाबतही तेच झालं. कॅनडा, ब्रिटन आदी देशांतून आंदोलनाचं समर्थन केलं जात आहे. त्याकडं दुर्लक्ष करणंच हितकारक होतं; परंतु आंदोलन हाताळता न आल्यानं सरकार एकामागून एक चुका करीत आहे. शेतकरी आंदोलनाबाबत ग्लोबल सेलिब्रिटिजचं ट्वीट म्हणजे भारताविरोधातील एक विचारपूर्वक रचण्यात आलेला कट आहे, असं सरकार आता म्हणायला लागलं आहे. त्याचे काही पुरावेही मिळाले आहेत, असं सांगितलं जातं. या पार्श्वभूमीवर भारताविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गविरोधात फिर्याद दाखल केली आहे. ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरणाशी संबंधित मुद्दे उचलून धरण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिनं आवाज उठविल्यानंतर भारतातील सेलिब्रिटी तिच्याविरोधात काहूर माजवायला लागले; परंतु गेल्या सत्तर दिवसांत त्यांना शेतकर्यांच्या आंदोलनाबाबत काही भाष्य करावं असं वाटलं नाही. भारताविरोधात कॅम्पेनिंग राबवण्याबाबतचा एक पूर्ण अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यात ’पोएटिक जस्टिस फाऊंडेशन’चंही नाव पुढं आलं आहे. ही फाऊंडेशन म्हणजे कॅनडामधील एक स्वयंसेवी संस्था आहे. कॅनडातून खलिस्तानवादी चळवळीला मदत मिळत होती, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळं कॅनडातील संस्थेविषयी शंका घ्यायला जागा आहे. भारताविरोधात प्रचार करण्यासाठी जो ’अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे, त्याचे एक गूगल डॉक्यूमेंट उघड झालं आहे. ग्रेटानं दोन ’अॅक्शन प्लॅन’ तयार केले आहेत. एका प्लॅनमध्ये 26 जानेवारीपर्यंतच्या कॅम्पेनिंगची माहिती देण्यात आली होती. ग्रेटानं हे ट्वीट तीन फेब्रुवारीला केले होते आणि नंतर ते डिलीट केलं. चार फेब्रुवारीला ग्रेटानं पुन्हा एक ट्वीट केलं. त्यात नव्यानं तयार करण्यात आलेला प्लॅन होता. ’सोशल मीडिया’वर या प्लॅनिंगचा ’पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’ही व्हायरल झालं आहे. या पीपीटीमध्ये ’पोएटिक जस्टिस फाऊंडेशन’चा लोगो लावण्यात आला आहे. या फाऊंडेशनच्या वेबसाईटवर शेतकर्यांशी संबंधित ’प्रोपोगंडा मटेरियल’ही उपलब्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या ’सोशल मीडिया साईट’वर देशविरोधी, प्रो-खलिस्तान साहित्यही उपलब्ध आहे. ’प्रोएटिक जस्टिस फाऊंडेशन’ कशाप्रकारे लोकांना भडकावण्याचं काम करत होते, त्याची काही उदारहरणंही आहेत. त्यात लिहिलं आहे, की, सरकार शेतकर्यांची हत्या करत आहे. 1984 मध्ये झालेल्या दंगलीची भीती दाखवण्यात आली, की सरकार शेतकर्यांचं दमन करण्यासाठी असं काही करू शकतं. देशातून किंवा परदेशातून होणारी टीका सहन करण्याची सरकारची तयारी नाही, हेच अशा कृतीतून दिसतं.
एखाद्या गोष्टीला अकारण महत्त्व दिलं, तर ती अधिक वेगानं पसरते. चेंडूचं जसं असतं, तसंच हे लपविण्याचंही असतं. चेंडू जोरात मारला, की तो तिचक्याच वेगानं पुन्हा उसळी मारतो. स्वीडनची पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग सध्या भारतात प्रचंड चर्चेत आहे. ग्रेटा ही भारतातील शेतकरी आंदोलनावर उघडपणे ’सोशल मीडिया’वर भाष्य करीत आहे. ग्रेटानं ’सोशल मीडिया’वर एक ’टूलकिट डॉक्युमेंट शेअर’ केलं होतं. आता हे टूलकिट बनवणार्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे. आधी ग्रेटावर फिर्याद दाखल झाल्याची चर्चा होती; मात्र नंतर ही फिर्याद ग्रेटावर नव्हे, तर हे टूलकिट बनवणार्यांविरोधात असल्याचं उघड झालं. हेच टूलकिट ग्रेटानं शेअर केलं होतं. दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतरही ग्रेटा घाबरलेली नाही. तिनं आपण अजूनही शेतकरी आंदोलकांसोबत आहोत, असं ’सोशल मीडिया’वर लिहिलं. कोणतीही भीती किंवा धमकी मला रोखू शकत नाही, असं ग्रेटा म्हणाली; मात्र ग्रेटानं जे टूलकिट शेअर केलं, ते नेमकं काय आहे? हे टूलकिट यापूर्वीही वापरलं होतं का, या प्रश्नांची उत्तरं शोधायला लागतील. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीचा नेमका अर्थ काय? असे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत. ग्रेटा थनबर्गनं ’सोशल मीडिया’वर आपली पोस्ट केली. त्यात भारतातील शेतकरी आंदोलनाप्रती एकजूट दाखवू असं ग्रेटा म्हणाली. त्यानंतर तिनं ’सोशल मीडिया’वर टूलकिट नावाचं एक डॉक्युमेंट शेअर केलं. थोड्या वेळानंतर ते डिलीट करून अपडेट टूलकिट शेअर केलं. याच टूलकिटमुळं वाद उफाळला आहे. टूलकिट हे एक असं डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आंदोलनादरम्यान ’सोशल मीडिया’वर समर्थन कसं मिळवावं, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या, तर कुठं संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावं, काय करू नये असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे. अशा प्रकारचं टूलकिट पहिल्यांदाच वापरात आहे असं अजिबात नाही. गेल्या वर्षी अमेरिकेत पोलिसांनी एका कृष्णवर्णीयाची भररस्त्यात हत्या केली होती. त्या वेळी तिथं ‘ब्लॅक लाईफ मॅटर’ ही मोहीम सुरू झाली होती. भारतासह जगभरातील सेलिब्रिटींसह नागरिकांनी रंगभेदाविरोधात आवाज उठवला होता. हे आंदोलन किंवा मोहीम सुरू करणार्यांनी टूलकिट बनवलं होतं. यामध्ये आंदोलनाबाबत सर्व माहिती दिली होती. जसं आंदोलनात कसं सहभागी व्हावं, कोणत्या ठिकाणी जावं, कुठं जाऊ नये, पोलिसांनी कारवाई सुरू केली तर काय करावं? आंदोलनावेळी कपडे कोणते घालावेत, पोलिसांनी पकडलं तर काय करावं? आंदोलकांचे अधिकार काय, अशी सर्व माहिती होती. हा कार्यक्रम पाहिला, तर त्यात वादग्रस्त काही नाही; परंतु आता सरकारनं फिर्याद दाखल केली असली, तरी परदेशातील संस्था, व्यक्तींवर कारवाई करायला मर्यादा असतात, याचं भान पोलिसांना नाही. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग ही स्वीडनची नागरिक आहे. त्यामुळं दिल्ली पोलिस तिच्याविरोधात कारवाई कशी करणार, असा प्रश्न आहे; मात्र जो नागरिक आपल्या देशाचा नागरिकच नाही, त्याच्याविरोधात आपण कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही, हे केवळ पोलिसांचं तंत्र आहे, असं तज्ज्ञ सांगतात. ग्रेटा थनबर्ग ही अवघी 18 वर्षांची स्वीडनची नागरिक आहे. ग्रेटाचा जन्म तीन जानेवारी 2003 रोजी स्टॉकहोममध्ये झाला. ग्रेटाचे आजोबा एस. अरहॅनियस वैज्ञानिक होते. ग्रीनहाऊस इफेक्टवर त्यांनी एक मॉडेल तयार केलं होतं, या कामगिरीमुळं 1903 साली रसायनशास्त्रातलं नोबेल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. तिची आई मालेना एमान एक ऑपेरा सिंगर आहे, तर वडील स्वांते थनबर्ग अभिनेते आहेत. ग्रेटा 11 वर्षांची होती तेव्हापासून ती ’ग्लोबल वार्मिंग’ आणि हवामानातील बदल थांबविण्यासाठी कार्यरत आहे. यासाठीच ग्रेटा दर शुक्रवारी स्वीडनच्या संसदेबाहेर निदर्शनं करु लागली. तिनं सुरू केलेली ही मोहीम ’फ्रायडे फॉर फ्युचर’ या नावानं ओळखली जाते. तिच्या या मोहिमेत आतापर्यंत अनेक देश जोडले गेले आहेत. ग्रेटाप्रमाणं जगभरातील हजारो मुलं ’ग्लोबल वॉर्मिंग’ आणि हवामानातील बदल थांबविण्यासाठी आवाज उठवित आहेत. 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये तिनं ’ग्लोबल वार्मिंग’ आणि हवामानातील बदल या विषयावर एक भाषण केलं होतं. तिच्या या भाषणाची जगभरात खूप चर्चा झाली. या भाषणात ग्रेटानं जगभरातील नेत्यांवर सडकून टीका केली. तिच्या या भाषणानंतर टाईम मासिकानं तिला 2019 साली पर्सन ऑफ द ईयर हा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला होता. भारतातील शेतकरी शांततेत आंदोलन करत आहेत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. कोणताही द्वेष, धमकी माझी मानवी हक्कांबाबतची ही भूमिका बदलू शकत नाही, असं ट्विट ग्रेटानं केलं आहे.