विनायक माळी/मालेगाव : मालेगाव शहरात बोगस दस्त तयार करून स्थावर मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावण्याचे प्रकार सर्रास घडू लागल्याने मालेगाव...
विनायक माळी/मालेगाव : मालेगाव शहरात बोगस दस्त तयार करून स्थावर मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावण्याचे प्रकार सर्रास घडू लागल्याने मालेगाव दुय्यम निबंधक कार्यालय दलालांचा अड्डा बनल्याचे काळे चिञ पहायाला मिळत आहे.दि.१६ फेब्रूवारी रोजी या संदर्भात एक वृत्त प्रसिध्द केल्यानंतर संबंधीतांचे धाबे दणाणले असून दुय्यम निबंधक कार्यालयाच्या भिंतीही हादरू लागल्या आहेत.दरम्यान चिञकुट येथील लक्ष्मी सचान यांची फसवणूक झाल्याचे वृत्त दै.लोकमंथनने प्रसिध्द केल्यानंतर अशा प्रकारची फसवणूक झालेल्या अनेकांनी तक्रारी दिल्या आहे.दुर्दैवाने या साऱ्या प्रकरणाच्या मुळाशी एक कथीत पञकार महिलाच असून तिचे दुय्यम निबंधक कार्यालयाशी असलेल्या लागेबांध्यांतून मुळ स्थावर मालमत्ता मालकांना फसविण्याचे धंदे जोरात सुरू आहेत.
लोकमंथनकडे ओळीने आलेल्या अनेक प्रकरणांपैकी हे एक प्रकरणः कलेक्टर पट्टा, संगमेश्वर मालेगाव येथे राहणाऱ्या एका कथित पञकार महिला एजंटने दाभाडी येथील उत्तम जगन्नाथ निकम यांना आर्थिक अडचण असल्याचे समजल्यानंतर त्यांना चार लाख पन्नास हजाराची मदत करण्याची तयारी दर्शवली.त्या मोबदल्यात त्यांची मिळकत क्र.९१/१/१ प्लॉट नंबर ७ ब,८ब १ क्षेत्र ९५१-१५ या सामायिक मालमत्तेपैकी उत्तरेकडील क्षेत्र ६९.८१ चौ.मी.बांधीव बंगला मदत म्हणून देत असलेल्या पैशांना हमी म्हणून जनरल मुखत्यार पत्र करून घेत पैसे परत केल्यावर पुन्हा सदर मालमत्ता परत करण्याच्या बोलीवर नोंदणी करून घेतली व मोबदल्यात रू.४५००००( चार लाख पन्नास हजार) रोख दिले.
कालांतराने सदर महिलेने उत्तम निकम यांना भेटून भाडेकरू म्हणून हेमंत निबा महाजन संगमेश्वर यांना सदर बंगला भाड्याने राहण्यासाठी देत असल्याचे सांगितले.परंतु जेव्हा हेमंत महाजन यांनी उत्तम निकम यांना सदर मालमत्ता ही रू.१४५०००० ( चौदा लाख पन्नास हजार) विकत( खरेदी) घेतल्याचे सांगितल्यावर निकम यांना प्रचंड मानसिक धक्का बसला ३० लाख किंमत असलेली मालमत्ता कवडीमोल किमतीत विकल्याने निकम यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक यांचेकडे अर्जाद्वारे तक्रार करून न्याय देण्याची विनंती केली आहे.एव्हढे होऊनही निकम यांनी जे झाले ते ठीक आहे झालेल्या व्यवहारा पोटी माझी राहिलेली रक्कम आपले कमीशन काढून मला द्या. असे सांगितले असता,कांता पाटील यांनी स्पष्ट नकार दिला.
पाटील नामक ही महिला या प्लॉट तसेच शेती,खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात या आधीही अनेक लोकांची फसवणूक केल्याची चर्चा आहे. त्या स्वतः वार्ताहर असल्याचे तसेच आपल्या चार चाकीवर प्रेस बोर्ड लावून गोरगरीब नागरिकांच्या असह्यातेचा फायदा घेऊन बिनबोभाट फसवणुक करत असल्याचे समजते.
जनरल मुखत्यार रद्द करण्याचे कारण सांगून निकम यांना सब रजिस्टर कार्यालयात बोलवून सदर मालमत्ता लबाडीने ,फसवून हेमंत महाजन यांचे नावे खरेदी करून देण्यात आल्याचे निकम यांनी अप्पर पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच या प्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने गुन्हा दाखल व्हावा म्हणून त्यांनी मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयात १५६/३ प्रमाणे परवानगी मागितली आहे.याआधीही याच महिलेने दि.२७/१/२०२१ रोजी या महिलेने संगमेश्वर,मालेगाव येथील स.न.४९/२ प्लॉट नंबर ९ पैकी क्षेत्र ८१.३० चौ.मी.हे बनावट कागदपत्र तयार करून लक्ष्मी उमेश सचान सध्या राहणार अकबरपुर,चित्रकूट,(उ.प्र.)यांची मालमत्ता स्वतःचे नाव लावून, सरला योगेंद्र चौधरी नामक महिलेला दुय्यम निंबंधक यांचे समोर लक्ष्मी उमेश सचान यांचे नावाने बोगस कागदपत्र सादर करून खरेदी करून घेतली.हा प्रकार लक्ष्मी सचान याना समजताच त्यांनी ऑनलाईन तक्रार छावणी पोलिसात दिली.समक्ष भेटून तक्रार देण्यास गेल्या असता त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही.
सदर प्रकार दुय्यम निंबधक यांचे लक्षात येताच त्यांनी सदरच्या दस्तची नोंदणी करून खरेदीदाराला न देता राखून ठेवल्याचे समजते.तसेच सदर खरेदी रद्द व्हावी म्हणून फसवणूक करणाऱ्या महिलेने अर्ज केल्याचेही खात्रीलायक रित्या समजते.(क्रमशः)
बाॕक्सः
दुय्यम निबंधक यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून पोलिसात तक्रार दाखल करणे गरजेचे असताना ते खरेदी रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. खरेदी देताना वेगळी व्यक्ती तिचे बनावट कागदपत्र व मूळ खरेदीवर मात्र मूळ मालकाचा फोटो असाही कारनामा या खरेदी व्यवहारात झालेला दिसून येत आहे.खरेदी खत नोंदविताना देणार व घेणार यांचे बायो मेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेवून खात्री करूनच खरेदी होणे आवश्यक असताना दुय्यम निबंधक कागद पत्रांची खातरजमा न करता खरेदी देतातच कशी ?असा प्रश्न निर्माण होतो.यात काही कर्मचारी व अधिकारी सामील असल्याशिवाय हे होणे शक्यच नाही अशीही चर्चा आहे.
बाॕक्सः
मालेगावमध्ये बोगस कागदपत्र तयार करणारी टोळीच सक्रिय असण्याची शक्यता आहे. तसेच आपले सरकार अंतर्गत आधार कार्ड सेंटर हे कुठलीही खातरजमा न करता बोगस आधार कार्ड,प्यान कार्ड नावे व फोटो दुरुस्त करून देत आहेत. यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.चंदनपुरी येथील निलंबित पोलिस पाटलाने बनावट दस्तऐवज व कागदपत्र तसेच आधार व pan कार्ड मध्ये छेडछाड करून मूळ नावात व फोटोत बदल करून बोगस खरेदी केली असल्याचे बोलले जात आहे.यासंदर्भातील संशयीतांमध्ये झालेल्या शाब्दीक चकमकीची ध्वनीचिञफीतही उपलब्ध आहे.आता तरी या लोकांची चौकशी होणार का ? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. ही सर्व साखळी असून सर्वांची चौकशी होवून कारवाई झाली पाहिजे.दैनिक लोक मंथनने हे प्रकरण लावून धरल्याने नवनवीन प्रकरण समोर येत आहेत याचा पाठपुरावा सुरूच राहणार असून या महिला दलाल व त्यांना सहाय्य करणारे सरकारी कर्मचारी, अधिकारी,व दलालांचा शोध घेणे गरजेचे आहे.