मुंबई/प्रतिनिधी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्र सरकारच्या विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधका...
मुंबई/प्रतिनिधी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्र सरकारच्या विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. या पार्श्वभूमीवर राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले असले, तरी कोण खरे, कोण खोटे हा वाद कायम असणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मसुरी येथे निघाले होते. मसुरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत आयएएस अधिकार्यांचा प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोश्यारी असणार आहेत. शुक्रवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम नियोजित आहे. त्यानुसार कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाहून 11 तारखेला सकाळी1 दहा वाजता डेहराडूनसाठी निघणार होते. या दौर्याच्या निमित्ताने राज्यपालांच्या सचिवालयाने महाराष्ट्र सरकारच्या अधिकार्यांना दोन फेब्रुवारी रोजी सरकारी विमानाचा वापर करण्यास परवानगी मिळावी म्हणून पत्र पाठवले होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही कळविण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी दहा वाजता राज्यपाल मुंबई विमानतळावर पोहोचले आणि सरकारी विमानात चढले. तथापि, माननीय त्यांना सांगण्यात आले, की शासकीय विमानाच्या वापरासाठी परवानगी मिळालेली नाही. राजभवन सचिवालयाला मुख्यमंत्री कार्यालयाने दौर्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच बुधवारीच विमान वापरण्यास परवानगी नसल्याचे कळविले होते. राज्यपालांच्या दौर्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही, याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे राजभवनाच्या संबंधित अधिकार्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपालांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही. वस्तुत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनानेदेखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकार्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
प्रशासकीय अडचणीमुळे परवानगी नाही
राज्यपालांच्या विमान प्रवासाला नाकारण्यात आलेली परवानगी ही प्रशासकीय अडचणींमुळे असू शकते. परवानगी नाकारण्यासंदर्भात विधान परिषदेतील आमदार नियुक्तीचा काहीही सबंध नाही, याउलट विधान परिषदेतील आमदार नियुक्त हे राज्यघटनेने दिलेले अधिकार असून राज्यपालांनी आमदार नियुक्तीला मंजुरी देणे अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
एक विमान नाही आवडले ; दुसर्याने केला प्रवास : कोश्यारी
काही कारणाने ते विमान मिळाले नाही, म्हणून दुसर्या विमानाने प्रवास केला. एक विमान नाही आवडले, तर दुसर्या विमानाने प्रवास केला, असे कोश्यारी म्हणाले. खासगी दौरा असल्याने परवानगी दिली नाही का? या प्रश्नावर आयएएस अधिकार्यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा काय असू शकतो? अशी विचारणा त्यांनी केली.