सातारा / प्रतिनिधी : सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून, त्याचा संयमाने आणि विवेकाने वापर केला पाहिजे. सोशल मीडिया रॅगिगसारख्या प्रवृत्तीला ब...
सातारा / प्रतिनिधी : सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून, त्याचा संयमाने आणि विवेकाने वापर केला पाहिजे. सोशल मीडिया रॅगिगसारख्या प्रवृत्तीला बळ देते. कारण, हे माध्यम सहज उपलब्ध झाले असून त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार, असा गंभीर प्रश्न डॉ. हमीद दाभोलकर यांनी उपस्थित केला.
सातारा शहरातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अॅटी रॅगिंग समिती आणि महिला विकास मंच यांच्या संयुक्तपणे डॉ. दाभोलकर यांचे सोशल मीडिया आणि युवकांची मानसिकता’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. दाभोलकर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डॉ. अनिसा मुजावर होत्या. डॉ. दाभोलकर यांनी रॅगिंग ही संकल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले, दारू, गांजा, तंबाखू याप्रमाणे सोशल मीडियाचा वापर हेही आता एक व्यसन झाले आहे. भारतीय समाजात आज सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याचा परिणाम म्हणून महिलांचे शोषण वाढले आहे. आता नातेसंबंधांमध्येही गुंतागुंत वाढली आहे. आभासी वास्तवात जगण्याची प्रवृत्ती वाढली आहे. व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. एकाग्रता कमी होणे, एकाकीपणा वाढणे, नैराश्य आदी समस्या निर्माण झाल्या आहेत आणि परिणामतः आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. म्हणून सोशल मीडियाच्या वापरावर आपले नियंत्रण असले पाहिजे.