चार दिवसात 24 हजार रुपये दंड वसूल शिराळा / प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क घालून घराबाहेर पडावे, असे आवाहन प्र...
चार दिवसात 24 हजार रुपये दंड वसूल
शिराळा / प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क घालून घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विनामास्क फिरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्याला न जुमानता नागरिक विनामास्क फिरत आहेत. त्यांच्याविरुध्द पोलीस अधिक्षक दीक्षीत गेडाम व उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी याबाबत कारवाई करण्याच्या सुचना दिल्या असून मागील चार दिवसांपासून कोकरुड पोलिसांनी कारवाईची ही मोहीम सुरू केली आहे. कोरोनाची दुसरी लाट वाढत असून तोंडाला मास्क न लावता फिरणार्यावर आता दंडात्मक कारवाई होणार आहे. यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कंबर कसली असुन कोरोना संरक्षणाचे नियम न पाळणार्या वर देखील पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर, कोकरूड पोलिसांनकडून गेल्या चार दिवसात विना मास्क फिरणार्या 120 नागरिकांवर कारवाई करून 24 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच नियमापेक्षा जास्त लोक एकत्र येणे, विना मास्क, फिरणे लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी गर्दी करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे अशा लोकांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचना असल्यामुळे कोकरूड पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. सपोनि ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार शंकर कदम, पोलीस नाईक पांढरे, पोलीस हवालदार अर्जुन पाटील, सतिश पाटील, सुहास डाकवे यांनी कार्यवाहीत सहभाग घेतला.