दहिवडी / प्रतिनिधी : भरदिवसा घरात घुसून चाकूचा धाक दाखवून सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना सत्रेवाडी (पिंगळी बु।, ता. माण) येथे घडल्य...
दहिवडी / प्रतिनिधी : भरदिवसा घरात घुसून चाकूचा धाक दाखवून सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना सत्रेवाडी (पिंगळी बु।, ता. माण) येथे घडल्याने एकच खळबळ माजली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, नम्रता सत्रे या आपल्या सत्रेवाडी येथील घरात दुपारी सव्वातीनच्या सुमारास आपल्या श्रेया या दोन वर्षांच्या मुलास झोपवून त्याच्या सोबत थांबल्या होत्या. त्याच सुमारास काळ्या-सावळ्या रंगाचे एक साधारण, तर दुसरा अंगाने मजबूत असे 20 ते 25 वर्षांचे दोन जण त्यांच्या घरात घुसले. त्यातील मजबूत युवकाने मुलाच्या गळ्यास चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत नम्रता यांच्या गळ्यातील दागिन्यांची मागणी केली. घाबरलेल्या सत्रे यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले असता त्याने अजून घरातील दागिन्यांची मागणी केली.
मात्र, तेवढ्यात घराच्या बाहेरून या या असा आवाज आल्याने दोघेजण घरातून बाहेर पळाले. जाताना दरवाजाला बाहेरून कडी लावली. बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीवरून पळून गेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख व सपोनि राजकुमार भुजबळ यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित करत आहेत.