अहमदनगर/प्रतिनिधी: नेवासे तालुक्यातील शेतकर्याने आपल्या शेतात उभ्या असलेल्या उसाला आग लावली. मुळा साखर कारखाना जाणीवपूर्वक ऊसतोड करत नस...
अहमदनगर/प्रतिनिधी: नेवासे तालुक्यातील शेतकर्याने आपल्या शेतात उभ्या असलेल्या उसाला आग लावली.मुळा साखर कारखाना जाणीवपूर्वक ऊसतोड करत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. शेतकरी ऊस ज्वलन आंदोलनाद्वारे आपला संताप व्यक्त करीत आहेत. कारखान्याने मात्र राजकीय विरोधातून ही केवळ स्टंटबाजी केली जात असल्याचे म्हटले आहे.
नेवासे तालुक्यातील करंजगाव येथील अशोक टेमक या शेतकर्याने आपल्या शेतातील उभ्या उसाला आग लावली. केवळ राजकीय विरोधक असल्याने मुळा सहकारी साखर कारखाना माझ्यावर अन्याय करत असल्याचा आरोप या शेतकर्याने केला आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखाना चालवला जात आहे. अनेकदा ऊस नोंद करायला जाऊनही नोंद घेतली नसल्याचे शेतकर्याचे म्हणणे आहे. टेमक यांनी आपल्या शेतातील दहा गुंठे क्षेत्रात असलेल्या उसाला कारखाना प्रशासनाच्या निषेधार्थ स्वतः आग लावली. माझ्यावर जसा अन्याय होतो, त्याच पद्धतीने दुसर्या शेतकर्यांवरही अन्याय होतो आहे, असे या शेतकर्याचे म्हणणे आहे. मुळा सहकारी साखर कारखाना परिसरात 34 लाख टन ऊसाचे क्षेत्र आहे. कारखाना 14 लाख टन ऊसाचे गाळप करू शकतो. ज्या तीस हजार शेतकर्यांनी कारखान्याकडे उसाच्या नोंदी केल्या आहेत. त्यांच्या ऊसाला अगोदर तोड येणार आहे. एकाचवेळी सगळा ऊस कसा तोडला जावू शकतो. या शेतकर्याने उसाची नोंदही केली नाही. आजचा प्रकार हा केवळ राजकीय स्टंटबाजी असून गडाखांना बदनाम करण्यासाठी हे सुरू असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष नाना तुवर यांनी सांगितले. दरम्यान, उसाला तोड दिली जात नसेल तर ऊस पेटवून देऊ, यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण देत असल्याचे एका तरुण शेतकर्याने गुरूवारीच म्हटले होते. सोनईतील ऋषिकेश शेटे यांनी शेतकर्याच्या मरणाच्या सोहळ्याचे आमंत्रण देतोय, असे म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यात शिवसेना मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गडाख हे विरोधक शेतकर्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही. शेतकर्यांची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे, शेतकर्यांनी या जाचाला कंटाळून ऊस पेटवून देण्याचे ठरवले आहे, इतकेच नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी दखल घेतली नाही, तर उसात आत्मदहन करू असा इशारा शेटे यांनाी दिला आहे.