मुंबई/प्रतिनिधीः दुसर्या लाटेत मुंबईमध्ये कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. पहिल्या लाटेच्या आकड्यांचा विक्रमही मोडीत निघाला असून, मुंबईत...
मुंबई/प्रतिनिधीः दुसर्या लाटेत मुंबईमध्ये कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. पहिल्या लाटेच्या आकड्यांचा विक्रमही मोडीत निघाला असून, मुंबईत दिवसाला अडीच हजार ते तीन हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहे. दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार आणि महापालिकेकडून सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे; मात्र तरीही काही लोक बेजबाबदार वर्तन करीत असून मुखपट्टीविना फिरणार्या 20 लाख लोकांवर महापालिकेने कारवाई केली आहे.
मुंबई महापालिकेने एप्रिल 2020 ते 21 मार्च 2021 पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत मुखपट्टीविना सार्वजनिक ठिकाणी फिरणार्या 20 लाख लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. या 20 लाख लोकांकडून महापालिकेने तब्बल 40 कोटी रुपये इतका दंड वसूल केला आहे. एकिकडे ‘मी जबाबदार’ अशी मोहीम सरकारकडून राबवली जात असताना अनेकजण सरकारच्या आवाहनाला हरताळ फासत असल्याचेच या आकडेवारीतून दिसते आहे. कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक कायम असून शहरात रविवारी तीन हजार 775 रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे. मुंबईत संसर्ग प्रसार वेगाने होत असून, रुग्णदुपटीचा कालावधी आठवडाभरात 186 दिवसांवरून 106 दिवसांवर आला आहे. रविवारी मुंबईत दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नऊ जण 60 वर्षांवरील होते, तर सात रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबई शहरात सध्या 23 हजार 448 रुग्ण उपचार घेत असून, बरे झालेल्या रुग्णांचा दर 91 टक्के आहे. रविवारी एक हजार 647 रुग्ण बरे होऊन घरी परतले. मागील चोवीस तासांत बाधितांच्या संपर्कातील 21 हजार 208 जणांचा शोध घेण्यात आला आहे. शहरात सध्या 316 सोसायट्या रुग्ण आढळल्याने सील करण्यात आल्या आहेत, तर प्रतिबंधित चाळी आणि झोपडपट्ट्यांची संख्या 40 वर गेली आहे.