माजी आमदार मदन भोसले यांच्यासह अधिकारी निर्दोष; निवडणूक जाहिर होण्यापूर्वी विद्यमान संचालकांना दिलासा भुईंज / वार्ताहर : शेतकर्यांना बांधाव...
माजी आमदार मदन भोसले यांच्यासह अधिकारी निर्दोष; निवडणूक जाहिर होण्यापूर्वी विद्यमान संचालकांना दिलासा
भुईंज / वार्ताहर : शेतकर्यांना बांधावर ऊस बियाणे पोच करण्याच्या योजनेवर आक्षेप घेत विरोधकांनी किसन वीर कारखान्याच्या पदाधिकार्यांसह अधिकार्यांना न्यायालयात खेचले होते. त्यांच्याविरोधात 45 खटले दाखल केले होते. यातील शेवटच्या खटल्याच्या निकालात मेढा न्यायालयाने देऊन सर्वांना निर्दोष ठरविले. त्यामुळे कारखान्याची निवडणूक जाहिर होण्यापूर्वी दाखल असलेल्या 45 खटल्यांतून किसन वीर’च्या विद्यमान पदाधिकार्यांची निर्दोष मुक्तता झाल्याने दिलासा मिळाला आहे.
किसन वीर कारखान्याच्या विरोधात दाखल असलेल्या शेवटच्या खटल्याची सुनावणी जावळी तालुक्यातील मेढा येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एम. काळे यांच्या समोर झाली. विरोधकांनी भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर 45 विविध खटले दाखल केले होते. कार्यक्षेत्रात पुरेशा उसाची उपलब्धता होण्यासाठी सन 2004 मध्ये शेतकर्यांना बांधावर ऊस बियाणे देण्याची योजना बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने राबविण्यात आली होती. या प्रकरणात कवठे (ता. वाई) येथील राहुल मधुकर डेरे यांनी मेढा पोलीस ठाण्यात कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी, अधिकार्यांनी संगनमताने बनावट कागदपत्र तयार करून 8 हजार 750 रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दिली होती. मेढा न्यायालयात त्याची सुनावणी होऊन या खटल्यातून या सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
सन 2004-05 या वर्षात कारखान्यात कमी गळीत झाले होते. त्यामुळे कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता व्हावी. यासाठी बँकेच्या सहकार्याने कारखान्याच्या वतीने योजना राबविली. या योजनेचा लाभ 2 हजार 725 शेतकर्यांनी घेत 1608.91 हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागण झाली. विरोधकांनी राजकारणातून संस्थेला वेठीस धरत 45 जणांना पुढे करत वाई न्यायालयात 37, सातारा न्यायालयात 2, मेढा न्यायालयात 6 खटले दाखल केले होते. या सर्वच्या सर्व खटल्यांतून कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर व इतरांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या खटल्याचे कारखान्याचे पदाधिकार्यांच्या वतीने अॅड. ताहिर मणेर, अॅड. दिनेश धुमाळ, अॅड. साहेबराव जाधव, अॅड. विद्या धुमाळ, अॅड. भारती कोरवार तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने अॅड. सुरेश खामकर यांनी कामकाज पाहिले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने शेतकर्यांसाठी राबवलेल्या योजनांबाबत खटले दाखल केले गेले. संस्था कशी बंद पडेल, असाच प्रयत्न तक्रारदारांच्या बोलवत्या धन्यांनी केला होता. न्यायदेवतेने न्याय केला. नियतीही न्याय करेल, अशी प्रतिक्रिया कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार मदन भोसले यांनी दिली.
कारखाना व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी योजना राबविली म्हणून न्यायालयात खेचले. त्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्यांचा विरोधकांनी वापर केला. याच प्रकरणात नाही तर प्रत्येक ठिकाणी अडचणी निर्माण करण्यासाठी विरोधकांनी कुरगुड्या केल्या. स्वत:च्या जळफळाटापोटी संस्थेशी खेळ करू नका, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष व माजी खासदार गजानन बाबर यांनी केले आहे.