लोकांनी काय खावं, काय प्यावं, काय घालावं, यावर नियंत्रण आणलं, तर त्यातून बंडखोर वृत्ती उफाळते. लोकांवर ते सोडलं पाहिजे; परंतु सरकारच्या धोरण...
लोकांनी काय खावं, काय प्यावं, काय घालावं, यावर नियंत्रण आणलं, तर त्यातून बंडखोर वृत्ती उफाळते. लोकांवर ते सोडलं पाहिजे; परंतु सरकारच्या धोरणात एकात्मता ऩसते आणि संस्कृतीचे ठेकेदार सरकारमध्ये बसले आहेत. त्यांची मानसिकताच सडकी झाली आहे. त्यामुळं मनाला येईल, ते बोलायचं आणि अंगावर वादळ ओढवून घ्यायचं, हे त्यांचं सातत्यानं सुरू असतं.
आपल्याला जी पदं मिळाली आहेत, ती जरी नीट सांभाळली, तरी खूप झालं, असं काहींच्या बाबतीत म्हणता येतं. ज्यात आपल्याला गती नाही, त्यात नाक खुपसायचं खरंतर काहीच कारण नाही. नको त्या गोष्टीत नाक खुपसलं, तर नाकाला दुखापत होण्याची शक्यता असते. संस्कृतीच्या ठेकेदारांना मात्र अशी नाक खुपसण्याची सवय असते. आपण काही केलं नाही, बोललो नाही, तर संस्कृतीच जणू रसातळाला जाईल, असं त्यांना सातत्यानं वाटत असतं. सर्वोच्च न्यायालय तसंच उच्च न्यायालयांनी सातत्यानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूनं कौल दिला आहे. कुणी काय खावं, काय प्यावं, काय ल्यावं यावर व्यक्तींचा अधिकार असतो. त्यावर नियामक संस्थेनं बंधनं घालून उपयोग नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तर जणू आपण संस्कृतीचे ठेकेदार असल्याचं वाटतं. कुणी काय घालावं, काय खावं यावर सरकार आणि भाजपचे नेते नियंत्रण आणू पाहत आहेत. उच्च न्यायालयांनी त्यावर कडक ताशेरे ओढूनही अशा नेत्यांना संस्कृती जतनाचा अधूनमधून उमाळा येत असतो. उत्तराखंडमध्ये ज्यांची नुकतीच मुख्यमंत्री म्हणून निवड झाली, त्या तीरथ सिंह रावत यांना असाच उमाळा आला आणि त्यांनी महिलांचा राग ओढवून घेतला. डेहराडून येथील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं. तरुण-तरुणींना संस्काराचं महत्व पटवून देताना रावत यांची जीभ चांगलीच घसरली. ’’मी एकदा जयपूरहून येत होतो. तेव्हा काही सहकारी माझ्यासोबत होते. दुसर्या दिवशी करवाचौथचा सण होता. माझे काही सहकारी दिल्लीचे होते. ते म्हणाले, की वर्षभर पत्नीला नाराज ठेवतो; मात्र करवाचौथच्या या एका दिवशी तरी त्यांचं मन राखावंच लागेल. मग मी त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्यासाठी निघालो. ज्यावेळी आम्ही विमानात बसलो, तेव्हा माझ्या बाजूला एक महिला बसली होती. मी तिच्याकडं पाहिलं, तेव्हा खाली गमबूट, आणखी वर बघितलं, तर तिच्या गुडघ्यावरची जीन्स फाटली होती, हात बघितले तर त्यामध्ये कडंच-कडं, असा तिचा एकूण अवतार होता,’’ असं रावत म्हणाले. मी तिची विचारपूस केली, तेव्हा तिनं दिल्लीला जात असल्याचं सांगितलं. मी स्वयंसेवी संस्था चालवते असं तिनं सांगितलं; मात्र गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती एनजीओ चालवते, समाजात जाते, सोबत लहान मुलं आहेत, या सगळ्यातून काय संस्कार होणार?, असा सवाल त्यांनी केला. जिन्स घातली म्हणजे संस्कार करता येत नाही, असा जणू जावईशोध तीरथ सिंह रावत यांनी लावला. शिवाय त्यांच्याच वक्तव्याचा आधार घेतला, तर मुख्यमंत्री, खासदार राहिलेल्या व्यक्तीनं महिलेकडे अशा तर्हेनं पाहणं यात कुठले आले संस्कार? तीरथ सिंह यांच्यावरच संस्कार झालेले नाही, असं त्यांच्या एकूण वक्तव्यावरून दिसतं. कपडे कोणते घातले, यावर संस्कार ठरत नाहीत. कपड्याच्या आत संस्कारी मन आहे, की नाही, हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं त्यांच्यावर टीका सुरू झाली. फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा सांभाळतील; पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय, असा खोचक सवाल उर्मिला मातोंडकर यांनी विचारला आहे. उर्मिला यांच्यासह अनेक दिग्गज महिलांनी ट्वीटरवर तीरथ सिंह रावत यांना फटकारलं आहे.
सध्याच्या काळात फाटलेली जीन्स म्हणजे स्टेटस सिम्बॉल समजलं जातं. व्यक्ती जितकी फाटलेली जीन्स घालेल तितकी ती श्रीमंत असं समजलं जातं. या सगळ्यातून आपण समाजाला आणि आपल्या लहान मुलांना काय शिकवत आहोत? संस्कारांची सुरुवात ही घरातून होते. आपण जसं वागतो, त्याचंच लहान मुलं अनुकरण करतात. त्यामुळं लहान मुलांना घरातूनच चांगले संस्कार मिळाले पाहिजेत. आपण कितीही पुढारलेलो असलो, तरी चांगले संस्कार मिळणं गरजेचं असतं. त्यामुळं आपण आयुष्यात कधीही अपयशी ठरणार नाही, असंही तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं होतं. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, त्यानंतर अभिनेत्री गुल पनाग यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर फटकारलं आहे. आमचे कपडे बदलण्याआधी स्वत:ची मानसिकता बदला, अशा शब्दात नव्या नवेली नंदानं इन्स्टाग्राम स्टेटसवर फटकारलं आहे. याशिवाय ट्वीटरवर अनेक युजर्सनी रावत यांच्यावर टीका केली आहे. देशभरातील महिला नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून त्यांना खडे बोल सुनावले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चतुर्वेदी यांनी तर रिप्ड जिन्समधील फोटो पोस्ट करत उपहासात्मक टीका केली आहे. महुआ मोइत्रांनी असं ट्वीट केलं आहे, की उत्तराखंडचे मुख्यमंत्री तुम्हाला जेव्हा पाहिलं तेव्हा वर, खाली, पुढं, मागं सगळीकडं आम्हाला केवळ एक निर्लज्ज माणूस दिसला. एक राज्य चालवता; पण मेंदू फाटका आहे तुमचा. मोहुआ मोईत्रांपाठोपाठ शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील मुख्यमंत्री रावत यांना लक्ष्य केलं आहे. त्यांनी स्वत:चा रिप्ड जीन्स परिधान केलेला एक फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, की देशातील संस्कृती आणि संस्कारांना अशा पुरुषांमुळे धोका आहे, जे महिला आणि त्यांनी निवडलेल्या गोष्टींवरून मत तयार करतात. मुख्यमंत्री रावतजी, तुम्ही तुमचे विचार बदला म्हणजे देश बदलेल, असं त्यांनी म्हटलं आहे. अमिताभची नात नव्या नंदा हिनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं, की आमचे कपडे बदलण्याआधी स्वतःची मानसिकता बदला.