शिराळा / प्रतिनिधी : सय्यदवाडी, येळापूर, ता. शिराळा येथे चांदोली अभयारण्यातील भरकटलेला चारा व पाण्याच्या शोधात बाहेर पडलेल्या महाकाय गव्याच...
शिराळा / प्रतिनिधी : सय्यदवाडी, येळापूर, ता. शिराळा येथे चांदोली अभयारण्यातील भरकटलेला चारा व पाण्याच्या शोधात बाहेर पडलेल्या महाकाय गव्याचे मानवी वस्तीत दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुरुवारी सकाळी गवळेवाडीच्या बाजूने पाण्याच्या शोधात आलेल्या वस्तीतून निनाई पठाराच्या बाजूस चाललेल्या शेकडो गव्यांचे लोकांना दर्शन झाल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले.
गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास कराड-शेडगेवाडी राज्य मार्गाच्या गवळेवाडीकडील बाजूच्या शेतात ऊस, शाळू, हायब्रीड आदी पिके मोठ्या प्रमाणात उभी आहेत. अत्यंत दाटीवाटीच्या या पिकातून वाट काढत एक भला मोठा गवा येत असल्याचे लहान मुलाने पाहिले. ही माहिती संपूर्ण परिसरात व वाडीत पसरल्याने कसला तरी मोठा म्हैशी सारखा प्राणी आपल्या घराच्या बाजूने जात असल्याचे घरातील लोकांना सांगितले. ते पाहण्यासाठी सर्वजण बाहेर आले असता हा गवा डोंगराच्या बाजूने जात होता. लोकांचा गोंगाट आणि हातवारे करण्याने गवा पळत वाघबीळाच्या बाजूने गेला. तेथील पाझर तलावात पाणी पिऊन पुन्हा पठारावर असणार्या निनाई मंदीराच्या दिशेने गेला. सय्यदवाडी येथील शेकडो ग्रामस्थांसह वाडीत रक्षाविसर्जनासाठी आलेल्या नातेवाईकांना त्याचे दर्शन घडले. मात्र, लोकांचा आरडा-ओरडा झाल्याने डोंगरातील झाडांमधून वाट काढत गव्याने पळ काढला. मात्र, सय्यदवाडी येथील मेणीचा ओढा परिसरातील शेतातून हा गवा आल्याने आणखी एखादा गवा असू शकतो काय याची चर्चा सुरु आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.