अहमदनगर/प्रतिनिधी- पुढील वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असून नगरपंचायत, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी का...
अहमदनगर/प्रतिनिधी- पुढील वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असून नगरपंचायत, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन विधान परिषदेचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी येथे केले. तालुका पातळीवर तालुका काँग्रेसबरोबर काँग्रेस पक्षाच्या असणार्या सर्व फ्रंटल संघटनांचे तालुकाव्यापी संघटन निर्माण करण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यात आला असून, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी युवकांवर विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी या कामात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी च्यावतीने आयोजित जिल्हा काँग्रेसच्या दक्षिण विभागातील जिल्हा कार्यकारिणी व तालुका अध्यक्षांच्या संघटनात्मक आढावा बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके उपस्थित होते. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष भैय्या वाबळे, कार्याध्यक्ष राहुल उगले, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे तसेच दक्षिण विभागातील तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, बाळासाहेब आढाव, किरण पाटील, संभाजी रोहकले, नासीर शेख, दीपक भोसले, शहाजीराजे भोसले, डॉ. अमोल फडके, मनोहर पोटे, सचिन घुले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष अनिस शेख, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाणे, एन.एस.यू. आय चे कार्याध्यक्ष अक्षय क्षीरसागर उपस्थित होते. आमदार तांबे पुढे म्हणाले, अहमदनगर जिल्हा काँग्रेसची जिल्हा पातळी, तालुका पातळी व ग्रामीण भागातील गाव पातळीपर्यंत त्रिस्तरीय संघटनात्मक बांधणी करण्याचा एक व्यापक कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आला असून गावपातळीपर्यंत सक्षम काँग्रेस पक्षाचे संघटन निर्माण करण्यासाठी युवकांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार असून युवक कार्यकर्त्यांनी या संघटनात्मक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष साळुंके म्हणाले की, जिल्ह्यात गाव पातळीपर्यंत काँग्रेसचे संघटन निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद गटाचे पातळीवर गट प्रमुख व पंचायत समिती गणाचे पातळीवर गण प्रमुख नेमण्यात येत असून प्रत्येक जिल्हा परिषद गटातील व गणातील प्रत्येक गावात शाखा निर्माण करण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून पुढील तीन महिन्यात प्रत्येक गटातील व गणातील गावपातळीपर्यंत काँग्रेसच्या ग्राम शाखा निर्माण करण्यात येतील. कार्याध्यक्ष गुजर म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक नगरपंचायत, नगरपरिषद व नगर पालिकेच्या प्रत्येक वॉर्डांत काँग्रेसची शाखा निर्माण करण्यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष जबाबदारी घेणार असून या काळात शहरातील सर्व सामाजिक घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी केले. याप्रसंगी किरण पाटील, बाळासाहेब आढाव, अमोल फडके, दीपक भोसले, नासीर शेख आदी अध्यक्षांनी अहवाल मांडला तर संपतराव म्हस्के यांनी आभार मानले.
आ. डॉ. तांबेंचा सत्कार
शिक्षकांच्या शासकीय वेतनाचा प्रश्न महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावल्याबद्दल अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आ. डॉ. सुधीर तांबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त करून मंत्री महोदय यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून तसा जीआर शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. या निर्णयामुळे विनावेतन शिक्षकांना महिना 11 हजार तर आधीपासून वेतन मिळणार्या शिक्षकांचे वेतन दुप्पट होणार आहे.