सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व्यापारी, किराणा दुकानदार, भाजी विक...
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व्यापारी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते यांना कोरोनाची चाचणी करुनच दुकानात बसावे, अशा चाचण्यांसाठी प्रशासनाकडून मिशन मोडवर काम केले जावे. तसेच लस देण्याचा वेग वाढवावा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाबाबत पालकमंत्री पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते.
या पुढे कोरोनाची तपासणी केल्यानंतर स्व. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयाकडून तपासणीचा अहवाल मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून लिंक मिळेल ती लिंक क्लिक केल्यानंतर प्राप्त होणार आहे. त्यामुळे आरटीपीसीआर केल्यानंतर लागणारा विलंब कमी होणार आहे. त्यामुळे जवळचा नातलग कोरोना बाधित झाला असल्यास उशीर न करता निकट सहवासींच्या तात्काळ चाचण्या करून घेण्याचे आवाहन ना. पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा दर 16.21 असून बरे होण्याचा दर 93.96 इतका आहे तर मृत्युचा दर 3.67 इतका आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आता लोक पुढे येत आहेत. हा वाढता प्रतिसाद पाहून जिल्ह्याने लसीची मोठ्या प्रमाणात मागणी राज्य शासनाकडे नोंदविली आहे. कोरोना संसर्ग रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कमीत-कमी 20 जणांची कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. ग्रामीण भागात या कामासाठी ग्रामदक्षता समितीने आणि शहरातील स्थानिक समित्यांनी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन ना. पाटील यांनी केले.