कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोल्हे गटाने पाशवी बहुमताच्या जोरावर विकास कामे नामंजूर केली म्हणून मी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचेकडे ...
कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोल्हे गटाने पाशवी बहुमताच्या जोरावर विकास कामे नामंजूर केली म्हणून मी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचेकडे ३०८ कलमानुसार अपील दाखल केले होते. दोन वेळा सुनावणी घेतल्यानंतर मे.जिल्हाधिकारी राजेंद्रजी भोसले यांनी अनुकूल निर्णय दिल्याने कोपरगाव शहरातील २८ कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला. कामे होणार या अपेक्षेने जनतेत समाधानाचे वातावरण तयार झाले.
इतके सर्व घडून गेल्यानंतरही कोल्हे गटाने सदरची २८ कामे करू नका असे लेखी पत्र दि.२८ /३ /२१ रोजी नगरपरिषदेला दिले आहे.कोल्हे गटाने जनाची नाही तर निदान मनाची तरी ठेवावी.इतके किळसवाणे राजकारण करून शहराचा विकास थांबवू नये. संजीवनीवर पत्र तयार करून त्यावर बिचाऱ्या नगरसेवकांना सह्या करायला लावून स्वतःचे राजकारण साधायचे, हे किती काळ करणार? तुमचेच नगरसेवक खाजगीत काय बोलतात हे जाणून घ्या. ज्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामे करायला तुम्ही विरोध करता ते नगरसेवक तुम्हाला दुवा देत असतील कि शिव्या याचा तरी विचार करा.
जिल्हाधिकारी साहेबांनी, दि १६/२/२१ च्या सर्वसाधारण सभेत कोल्हे गटाने बहुमताने केलेला ठराव क्र.११ स्थगित करण्याचा आदेश दि.२३/३/२०२१ रोजी दिलेला असूनही कोल्हे गटाची सतत विरोध करण्याची खुमखुमी कमी झालेली नाही. जनतेने काळजी करू नये. अशा प्रकारच्या विरोधाला भिक न घालता विकासकामे मार्गी लागणार आहेत याची खात्री बाळगा.
जिल्हाधिकारी साहेबांनी ३०८ बाबत दिलेल्या आदेशाचा नेमका अर्थ काय हे समजून घ्या, यंत्रणा आहे म्हणून नाहक पत्र देऊन अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही अशी माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.