नवीदिल्लीः दिल्लीच्या सीमेवर गेल्या चार महिन्यांपासून कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलन स्थळांवर कोरोनासं...
नवीदिल्लीः दिल्लीच्या सीमेवर गेल्या चार महिन्यांपासून कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलन स्थळांवर कोरोनासंदर्भातले नियम, सोशल डिस्टन्सिंग, मास्क याविषयी चिंता व्यक्त केली जात असतानाच आता थेट आंदोलक शेतकर्यांकडूनच एक मागणी करण्यात आली आहे. आंदोलन स्थळावर असलेल्या शेतकर्यांना कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी आंदोलकांचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केली आहे.
आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींदरम्यान चर्चेच्या अनेक फेर्या गेल्या चार महिन्यांमध्ये झाल्या आहेत; मात्र अद्याप या समस्येवर तोडगा निघालेला नाही. हमीभाव आणि इतर मुद्द्यांवर शेतकर्यांनी आपला विरोध सुरूच ठेवला आहे. केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर शेतकरी ठाम आहेत. 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर घडलेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलक बॅकफूटवर गेल्याचे म्हटले जात होते. आंदोलकांचे काही गट फुटून परत गेले; मात्र तरीदेखील मोठ्या संख्येने आंदोलक अजूनही दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत.
मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलक एकाच ठिकाणी असल्यामुळे या आंदोलकांना कोरोनाची लस देण्याची मागणी टिकैत यांनी केली आहे. कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे त्यासंदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पाळल्या गेल्या पाहिजेत. जे लोकं आंदोलनस्थळी बसले आहेत, त्यांनादेखील लस दिली गेली पाहिजे. मी स्वत: देखील लस घेणार आहे. आंदोलन स्थळावर आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहोत, असे ते म्हणाले.