अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार राहिलेले दिलीप गांधी यांनी तीनहीवेळा दणक्यात विजय मिळवले होते. 2019मध्ये चौथ्यांदा त्यांना लढण्य...
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार राहिलेले दिलीप गांधी यांनी तीनहीवेळा दणक्यात विजय मिळवले होते. 2019मध्ये चौथ्यांदा त्यांना लढण्याची व विजयाचीही संधी होती. पण जिल्ह्यातील मातब्बर राजकीय घराणे विखे परिवाराने स्वतःसाठी सेफ गेम खेळताना गांधींचा पत्ता मात्र कट झाला. नगर लोकसभा मतदार संघात उमेदवारी करायचीच, याच हेतूने पूर्ण तयारीत असलेले डॉ. सुजय विखे यांनी भाजपकडून उमेदवारी करीत सेफ राजकीय गेम खेळण्यासच प्राधान्य दिले.
कौटुंबिक पक्ष परंपरेनुसार काँग्रेस आघाडीकडे त्यांनी उमेदवारी मागितली, पण ती मिळत
नसल्याने व राष्ट्रवादीकडूनही त्यांना उमेदवारी देण्याबाबत आढेवेढे सुरू झाल्याने अखेर भाजपचा पंचा गळ्यात घालून घेण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय त्यावेळी सावध खेळी मानला गेला. पण तो दिलीप गांधी यांच्या मूळावर आला. त्यांचे राजकारणच त्यानंतर संपून गेले. नगर लोकसभेच्या मागील चार निवडणुकांतून दोनवेळा थेट तर दोनवेळा तिरंगी लढती झाल्या आहेत. यापैकी एका थेट लढतीतच राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. तिरंगी लढतीत अपक्षाची डाळ शिजत नाही, हे दोनवेळा सिद्ध झाल्याने अपक्ष उतरून राजकीय आत्महत्या करण्यापेक्षा पक्षाचे मंगळसूत्र गळ्यात घालून लढणेच श्रेयस्कर विखेंनी मानले. पण यातून दिलीप गांधींचा दावा संपला व नंतर त्यांचे राजकारणही अस्ताला लागले.
ते विजय दणक्यात
1999च्या निवडणुकीत आघाडीचे दादा पाटील शेळके व अपक्ष बाबासाहेब भोस यांच्यात मतविभागणी होऊन भाजपचे दिलीप गांधी विजयी झाले होते. याचीच पुनरावृत्ती 2009मध्ये झाली. यातही विजयी गांधीच झाले, पण मतविभागणीला सामोरे जाणारे राष्ट्रवादीचे (सध्या भाजपचे माजी आमदार) शिवाजी कर्डिले व अपक्ष राजीव राजळे होते. मधल्या 2004 निवडणुकीत दिलीप गांधींचे तिकीट कट झाले होते. त्यामुळे त्यावेळच्या थेट लढतीत राष्ट्रवादीच्या तुकाराम गडाखांनी भाजपच्या प्रा. ना. स. फरांदे यांचा पराभव केला होता. तर 2014च्या निवडणुकीत राजळे व गांधी अशा थेट लढतीत मोदी लाटेचा फायदा होऊन गांधींनी तिसर्यांदा बाजी मारली होती. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर 2019मध्ये नगरच्या उमेदवारीवर गांधींचाच दावा होता. पण ऐनवेळी सुजय विखे पक्षात आल्याने त्यांना उमेदवारी मिळाली व गांधींना मग जवळपास राजकीय संन्यास घ्यावा लागला.
‘जाती’चा आधार फोल
नगर लोकसभा मतदारसंघात नगरसेवक, उपनगराध्यक्ष, तीन वेळा खासदार, एकदा केंद्रीय मंत्री एवढेच नव्हे तर शतक महोत्सवी परंपरा लाभलेल्या नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष अशी अनेकविध पदे भूषवलेले दिलीप गांधी यांनी 2019मध्ये तिकीट कापण्याची वेळ आली तेव्हा तिकिटासाठी जातीचा आधार घेतला होता. ते देशातील एकमेव जैन खासदार असल्याचे म्हणणे त्यांच्या समर्थकांचे होते. त्यामुळे आधी या समर्थकांनी व नंतर नगर शहरातील त्यांच्या जातबांधवांनी एकत्र येऊन गांधींवर अन्याय म्हणजे जैन समाजावर अन्याय होणार असल्याचा दावा करीत भाजपने हे तिकीट कापले तर देशभरात त्याचे परिणाम या पक्षाला भोगावे लागतील, असा इशाराही दिला होता. नगर शहरातील जैन समाजाच्या काही प्रतिष्ठितांनी अशी एकी दाखवत गांधींच्या तिकिटासाठी प्रयत्न सुरू केले होेते व देशातील जैन मान्यवर या मागणीच्या पाठीशी असल्याचाही त्यांचा दावा होता. मात्र, त्याचा फायदा काहीच झाला नाही. देशात मोदी सरकार 2014मयिे आल्यानंतर देशातील मी एकमेव जैन खासदार असल्याने मला मंत्रिपद देण्याची मागणी खुद्द गांधींनीच थेट मोदींकडेच केल्याचे बोलले जात होते. त्याची दखल तेव्हा घेतली गेली नसल्याने 2019मध्ये जातीच्या आधारावर त्यांना तिकीट मिळालेच नाही.