पुणे/प्रतिनिधी : पुण्यात 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्म...
पुणे/प्रतिनिधी : पुण्यात 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने प्रक्षोभक भाषण करून हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे विधान केल्याचा आरोप करण्यात आला होता. स्वारगेट पोलिस ठाण्यात त्याचा जबाब नोंदवण्यात आला. जवळपास तीन तास उस्मानीचा जबाब नोंदविण्याचे काम सुरु होते.या संदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत उस्मानीने वादग्रस्त विधान केले. या प्रकरणी भाजपचे नेते प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार 153 अ कलमाअंतर्गत उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उस्मानीवर कारवाई करण्यात यावी यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण झाले. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असताना उस्मानीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. माझ्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा असे उस्मानीने याचिकेमध्ये म्हटले होते.
पुणे पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न करता उस्मानीचा जबाब नोंदवून घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले होते. तसेच उस्मानी याला स्वारगेट पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार मागील आठवड्यात आठ मार्च रोजी शरजील उस्मानी हा स्वारगेट पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब नोंदवून गेला होता; मात्र आणखी काही माहिती हवी असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार आज पुन्हा स्वारगेट पोलिस ठाण्यात शरजील उस्मानी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आला. पोलिसांनी जवळपास तीन तास त्याची चौकशी केली.