मुंबई/प्रतिनिधीः एका युवकासोबत झालेली मैत्री काही कारणांमुळे तोडणे एका युवतीच्या जीवावर बेतले आहे. एका युवतीने मैत्री तोडली, म्हणून संतापलेल...
मुंबई/प्रतिनिधीः एका युवकासोबत झालेली मैत्री काही कारणांमुळे तोडणे एका युवतीच्या जीवावर बेतले आहे. एका युवतीने मैत्री तोडली, म्हणून संतापलेल्या युवकाने मैत्रिणीसह तिच्या आईवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. या दोघींवर त्याने अनेक वार केले आहेत. यानंतर त्याने विष प्राशन करून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मुंबईच्या वसई परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय पीडित तरुणी मुंबईतील वसई एव्हरशाईन याठिकाणी राहते. आज सकाळी ती तिच्या आईसोबत असताना तिच्या मित्राने घरात प्रवेश करून अचानक हल्ला केला. आरोपी तरुणाने धारदार चाकूने संबंधित तरुणीवर आणि तिच्या आईवर अनेक वार केले आहेत. या घटनेनंतर त्याने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी तरुण हा जखमी तरुणीचा जवळचा मित्र आहे. गेल्या काही काळापासून त्या दोघांचे मैत्रीचे संबंध होते; पण काही कारणांमुळे दोघांच्या मैत्रीला तडा गेला. यामुळे तरुणीने आरोपी तरुणाशी असलेले मैत्रीचे संबंध तोडले. याचाच राग मनात धरून आरोपी तरुणाने तिच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात संबंधित तरुणी आणि तिची आई दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.