पुणे/प्रतिनिधीः गेल्या काही वर्षांपासून उच्च न्यायालयाने ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे बैलगाडा प्रेमींचे अर्थकार...
पुणे/प्रतिनिधीः गेल्या काही वर्षांपासून उच्च न्यायालयाने ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे बैलगाडा प्रेमींचे अर्थकारण कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर जैदवाडी येथील सुभाष पोपट जैद यांनी परिस्थितीचे सोने केले आहे. त्यांनी आपली बैलजोडी सजवून लग्नासाठी देण्याचा नवीन व्यवसाय शोधून काढला आहे.
अलीकडच्या काही काळात लग्नाळू मुलामुलींचे विवाह अगदी साध्या पद्धतीने साजरे होत आहेत. लग्नाची वरात बैलगाडीवरून काढण्याची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील सुभाष पोपट जैद या शेतकर्याने व्यवसायाची नवीन संधी शोधली आहे. एरवी लग्न म्हटले की अलिशान गाड्या, अवाजवी खर्च हे सारे काही आलेच; पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात लग्नाचा ट्रेंड बदलला असून नागरिक आता साध्या आणि जुन्या पद्धतीने लग्न करण्याकडे वळत आहेत. जैद यांनी नवरा-नवरीच्या मिरवणुकीसाठी सजवलेल्या बैलजोडीसह बैलगाडी भाड्याने उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. त्याच्या या बैलजोडीला ग्रामीण भागासह शहरातूनही मागणी वाढली आहे. न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यामुळे अनेक शेतकर्यांनी आपल्या जवळचे बैल विकून टाकले; मात्र सुभाष जैद यांनी अडगळीतल्या बैलगाडीला सजवून ही बैलगाडी लग्नातील मिरवणुकीसाठी भाड्याने देण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला. जैद आपली बैलजोडी आणि बैलगाडी विवाहस्थळी घेवून जाण्यासाठी टेम्पोचा वापर करतात. यासाठी त्यांना एका दिवसाचे साधारणतः 15 ते 20 हजार रुपये भाडेही मिळत आहे. या व्यवसायातून त्यांनी आतापर्यंत सहा तरुणांना रोजगारही दिला आहे.